Rishabh Pant MS Dhoni, IND vs SL: महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेटमधील एक लोकप्रिय नाव. त्याने अनेक वर्षे क्रिकेटवर राज्य केले. भारताला याआधी धोनीसारखा यष्टिरक्षक मिळाला नव्हता. कोणताही फॉरमॅट असो, धोनीने टीम इंडियाला त्याची फलंदाजी, विकेटकीपिंग आणि नेतृत्वकौशल्याने सामने जिंकवून दिले. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर टीम इंडियाला त्याच्यासारखा मॅचविनर यष्टिरक्षक-फलंदाज मिळेल असं चाहत्यांना वाटत नव्हतं. या बाबतीत टीम इंडिया थोडी नशीबवान ठरली. धोनीनंतर त्याचा शिष्य रिषभ पंतसारखा यष्टिरक्षक-फलंदाज भारताला मिळाला. या शिष्याने गुरूलाही संपूर्ण कारकिर्दीत न जमलेला पराक्रम करून दाखवला.
रिषभ पंतने फार कमी वेळात अप्रतिम प्रगती करून दाखवली आणि संघात आपली जागा पक्की केली. श्रीलंका विरूद्ध त्याने दमदार कामगिरी करून दाखवली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर त्याने सामने जिंकवून दिलेच पण आता त्याच्या यष्टीरक्षण कौशल्यातही सुधारणा दिसू लागली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतने असे काही करून दाखवले जे धोनीसारखा महान यष्टिरक्षक फलंदाज त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत करू शकला नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतला मालिकावीर (Rishabh Pant Player Of The Series Award) म्हणून गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारा तो भारताचा पहिला यष्टिरक्षक-फलंदाज आहे. याआधी ९० कसोटी आणि ३२ कसोटी मालिका खेळलेल्या धोनीसारख्या यष्टिरक्षकाला त्या काळात एकदाही मालिकावीराचा पुरस्कार मिळवता आला नाही. मात्र रिषभ पंतने आपल्या ११व्या कसोटी मालिकेतच हा पराक्रम करून दाखवला.
ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३ डावात ६२ च्या सरासरीने १८५ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १२० पेक्षाही जास्त होता. कसोटी क्रिकेटमध्ये अशी स्फोटक फलंदाजी क्वचितच पाहायला मिळते. बंगळुरू कसोटीच्या गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर पंतने झटपट अर्धशतक ठोकले. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ 28 चेंडू घेतले. हा एक विक्रम होता. याशिवाय पंतने या मालिकेत एकूण ८ गडी बाद करण्यात संघाला सहकार्य केलं. त्याने ५ झेल आणि ३ स्टंपिंग केले.