MS Dhoni CSK, IPL 2023: आयपीएलच्या 16व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतरचे पोस्ट मॅच प्रेंझेटेशन चांगलेच चर्चेत राहिले. धोनीने हसत हसत एका पुरस्काराची मागणी केली. चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात धोनीने स्टंपच्या मागे जबरदस्त चपळाई दाखवली. मयंक अग्रवालविरुद्ध जबरदस्त स्टंपिंग असो किंवा तिक्ष्णाच्या चेंडूवर विरोधी कर्णधार एडन मार्करामचा झेल असो, धोनी अप्रतिम होता. पण तरीही धोनीने आपण म्हातारे होत आहोत हे मान्य करायला मागेपुढे पाहिले नाही आणि त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही एक उदाहरण दिले.
नक्की काय बोलला धोनी?
धोनीने बोलता बोलता हसत-हसत 'कॅच ऑफ द मॅच' पुरस्काराची मागणी केली. धोनी म्हणाला की, उत्तम झेल घेऊनही मला पुरस्कार मिळत नाही. फक्त मी यष्टिरक्षक आहे म्हणून आणि आमच्या हातात ग्लोव्ह्ज असतात म्हणून काहींना वाटतं की तो सोपा झेल असतो. पण असे अजिबात नसते. याच्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगताना माही म्हणाला, 'खूप वर्षांपूर्वी राहुल द्रविड किपिंग करत असताना असेच काहीसे घडले होते. तुम्ही केवळ तुमच्या कौशल्याने असा झेल घेऊ शकत नाही, त्यासाठी तितकेच खंबीरपणे स्टंपच्या मागे उभे राहावे लागते, असे त्याने सांगितले. "जसे जसे तुमचे वय वाढत जाते तसेतसे तुम्ही अधिक अनुभवी होत जाता पण त्यासोबतच तुम्ही म्हातारेही होता. कारण तुम्ही सचिन पाजी नसता, ज्याने वयाच्या 16-17 व्या वर्षी खेळायला सुरुवात केली होती."
हा माझ्या करियरचा शेवटचा टप्पा!
सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केल्यानंतर धोनी म्हणाला, 'मी आणखी काय बोलणार? आता मी काही बोललो तरी हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे. दोन वर्षांनंतर चाहत्यांना इथे येऊन पाहण्याची संधी मिळाली आहे. येथे खेळणे छान वाटते. प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले आहे. मला फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही, पण त्याची मला तक्रार नाही. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर आम्हाला प्रथम क्षेत्ररक्षणाची संधी मिळाली आणि वाटत होते की जास्त दव राहणार नाही. पण तसे घडले नाही. तरीही आमच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली आणि वेगवान गोलंदाजांनी, विशेषत: पाथिरानानेही चांगली गोलंदाजी केली, असे धोनी म्हणाला.
दरम्यान, सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले आणि म्हणाला, 'पराभव कधीही चांगले नसतात, पण फलंदाजांनी निराश केले. आम्हाला चांगली भागीदारी करता आली नाही. या विकेटवर 130 ही चांगली धावसंख्या नव्हती. आम्ही 160 धावा करायला हव्या होत्या, असेही त्याने मान्य केले.
Web Title: MS Dhoni Said it is the final phase of my career So I am enjoying it all after CSK won over SRH in IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.