ms dhoni news । नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) २०११ च्या विश्वचषकातील आठवणींना उजाळा देत एक मोठे विधान केले आहे. खरं तर धोनीच्याच नेतृत्वात भारत १२ वर्षांपूर्वी जगज्जेता झाला होता. धोनीच्या म्हणण्यानुसार, केवळ विश्वचषक जिंकणे हा क्षण त्याच्यासाठी अविस्मरणीय नाही, तर जेव्हा संपूर्ण स्टेडियम एकसाथ उभे राहून वंदे मातरम म्हणत होते. तेव्हा त्या क्षणाला शब्दांत व्यक्त केले जाऊ शकत नाही. याशिवाय तो क्षण आणि ती स्थिती पुन्हा येणे कठीण असल्याचे धोनीने म्हटले.
दरम्यान, भारतीय संघाने २०११ चा विश्वचषक जिंकलेल्या काल बरोबर १२ वर्षे पूर्ण झाली. २ एप्रिल २०११ या दिवशी भारतीय संघाने श्रीलंकेला पराभवाची धूळ चारून चॅम्पियन होण्याचे स्वप्न साकार केले होते. या अंतिम सामन्यात धोनीने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला होता. हा षटकार आणि तो क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे.
ती स्थिती पुन्हा होणे कठीण - धोनीमहेंद्रसिंग धोनीने विश्वचषकातील फायनलच्या सामन्यातील आठवणींना उजाळा देताना एक विधान केले आहे. चेन्नईतील एका कार्यक्रमादरम्यान धोनीने म्हटले, "माझा सर्वात आवडता क्षण म्हणजे विजयाच्या आधीची १०-१५ मिनिटे. कारण त्या वेळी संपूर्ण स्टेडियम वंदे मातरम म्हणत होते. त्यामुळे मला वाटते की तो क्षण आणि तशी स्थिती पुन्हा होणे खूप कठीण आहे. कदाचित आगामी वन डे विश्वचषकात ही गोष्ट होईल, कारण यावेळी विश्वचषकाची स्पर्धा भारतात होणार आहे. पण त्यासारखी स्थिती पुन्हा होईल असे वाटत नाही. असे तेव्हाच होऊ शकते जेव्हा २०११ च्या विश्वचषकातील फायनलप्रमाणे स्थिती असेल आणि ४०, ५० किंवा ६० हजार प्रेक्षक हे गीत गात असतील. हे गाणं सुरू असेपर्यंत मला माहिती होते की आम्हीच सामना जिंकणार."
लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघ विजेता होण्याच्या खूप जवळ होता तेव्हा ११ चेंडूत केवळ ४ धावांची आवश्यकता होती. तेव्हा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकात ठोकून भारताला जगज्जेता बनवले. तो क्षण आणि त्या दिवसाची आजही इतिहासाच्या पानावर नोंद आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"