भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून सध्या दूरच आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर त्यानं मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही माघारी घेतली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची शक्यताही नाही. त्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेलाही मुकावे लागणार आहे. क्रिकेटपासून दूर असलेला माही सध्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे.
धोनीचं क्रिकेटपासून दूर असणं म्हणजे त्याच्या डोक्यात निवृत्तीचा विचार सुरू असल्याचा तर्क चाहते लावत आहेत. पण, धोनीनं अजून या बद्दल मौन सोडलेलं नाही. भारतीय संघाची निवड समितीनेही धोनीच्या निवृत्तीबाबत काहीच बोलणं न झाल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून निवड समितीनं रिषभ पंतला अधिकाधिक संधी देण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे. पण, पंतचे अपयश निवड समितीची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्या नावांचा विचार सुरू आहे.
धोनीनेही युवा यष्टिरक्षकांना अधिक संधी मिळावी म्हणून क्रिकेटपासून दूर राहणे पसंत केले आहे. पण, या कालावधीत एकाही युवा खेळाडूला आपली छाप पाडता न आल्यास धोनी हा निवड समितीचा संकटमोचक ठरू शकतो. क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीनं मंगळवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात त्याचा मित्र सिमांत फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे आणि पहिल्याच चेंडूवर सिमांता यष्टिचीत झाला आहे. अंधार असल्यामुळे सिमांताला चेंडू दिसला नाही. आणि त्यामुळे धोनीनं व्हिडीओखाली माफी मागितली आहे.
धोनीनं लिहिलं की,''पुढे काय घडणार आहे हे माहित असते तेव्हा आपण कॅमेरा सुरू असतो आणि पुढच्याच मिनिटात ती गोष्ट घडते. अंधुक प्रकाशासाठी क्षमा मागतो, पण हे मजेशीर होतं. पहिला चेंडू हा ट्राय चेंडू असतो, पण पंचांचा निर्णय हा अंतिम. शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या. ''
पाहा व्हिडीओ...
... म्हणून धोनीनं घेतलीय विश्रांती; जाणून घ्या 'कॅप्टन कूल'चा हेतू 38 वर्षीय धोनीनं नोव्हेंबर महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही तो संघाचा सदस्य नसेल. मात्र, त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 मालिकेतून तो कमबॅक करू शकतो. IANSला मिळालेल्या माहितीनुसार धोनीनं विश्रांती घेण्यामागे एक कारण आहे. 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पंत आणि त्याच्यासारख्या उदयोन्मुख यष्टिरक्षकांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. धोनी पुन्हा टीम इंडियाकडून खेळेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. पण, पंत किंवा अन्य युवा यष्टिरक्षक अपयशी ठरल्यास धोनी हा संघाचा बॅकअप प्लान असेल.