मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताच्या संघात कोणते खेळाडू असतील, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. भारताने बऱ्याच महिन्यांपासून भारताची विश्वचषकासाठी संघबांधणीही सुरु आहे. पण नुकत्याच जाहीर झालेल्या व्हेरी व्हेरी स्पेशल टीममधून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सलामीवीर शिखर धवन यांना स्थान देण्यात आलेले नाही. पण या संघात सतत नापास ठरलेल्या रिषभ पंतला मात्र स्थान देण्यात आलेले आहे. हा संघ १५ संभाव्य खेळाडूंचा निवडण्यात आला आहे.
भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे आहे. त्याचबरोबर या संघाच्या सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मधल्या फळीत कोहलीला श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि पंत हे फलंदाज असतील.
या संघात तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या तीन अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांना संधी देण्यात आली आहे. या तीन अष्टपैलू खेळाडूंवर संघाचा समतोल राखण्याची जबाबदारी असेल.
भारताच्या गोलंदाजांच्या ताफ्यांमध्ये चार वेगवान आणि दोन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या वेगवान माऱ्याची मदार यावेळी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर यांच्यावर असेल. त्याचबरोबर भारतीय संघात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे दोन फिरकीपटूही असतील. भारताचा माजी महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने ही टीम आज जाहीर केली आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार.