रांची: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सध्या गुडघेदुखीने त्रस्त आहे. त्याच्या या गुडघेदुखीचा उपचार तो कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही तर झारखंडची राजधानी रांचीजवळील एका गावात झाडाखाली बसणाऱ्या वैद्याकडून घेत आहे. हे वैद्य रुग्णांवर जंगली औषधी वनस्पतींच्या मदतीने उपचार करतात. औषधाच्या डोससाठी ते प्रत्येक रुग्णाकडून फक्त 20 रुपये आणि फी म्हणून 20 रुपये, असे एकूण 40 रुपये घेतात. है वेद्य धोनीकडूनही फक्त 40 रुपये घेत आहेत.
धोनीमध्ये कॅल्शियमची कमतरता
रांचीपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या लापुंगच्या गलगली धाममध्ये देशी गाईचे दूध, झाडाची साल आणि अनेक वनौषधींपासून औषधे बनवली जातात. महेंद्रसिंग धोनी आतापर्यंत या वैद्यांकडे 4 वेळा आला आहे. वैद्य वंदनसिंह खेरवार यांच्याकडूनच धोनी आपल्या गुडघेदुखीवर उपचार करुन घेत आहे. विशेष म्हणजे, वंदनसिंह प्रसिद्ध वैद्य असून, अनेक राज्यातून लोक त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. वैद्य म्हणाले की, धोनीने त्याचा त्रास त्यांना सविस्तरपणे सांगितला. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्याच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना होत आहेत. यामुळे धोनीला चालणेही कठीण झाले आहे. आता वंदनसिंह यांचे औषध खाल्ल्याने धोनीला मोठा दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
वैद्य वंदनसिंह खेरवार यांचे औषध घेतल्याने सांधेदुखी कायमची बरी होते, असे रुग्ण सांगतात. दरम्यान, वैद्य वंदनसिंह खेरवार यांनी सांगितले की, महेंद्रसिंह धोनी सामान्य रुग्णाप्रमाणे येथे येतो आणि त्याचे औषध घेतो. तो कधीही मोठा माणूस असल्याचा अभिमान किंवा गर्व दाखवत नाही. धोनी जेव्हा-जेव्हा येथे येतो, तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळे धोनी आता गावात पोहोचल्यावर गाडीत बसूनच औषधाचा डोस घेऊन निघून जातो. गेल्या महिनाभरात गावातील अनेकांनी त्याच्यासोबत फोटोही काढले आहेत.
धोनीच्या पालकांना हेच वैद्य औषध देतात
विशेष म्हणजे, धोनीला वंदनसिंह यांच्याबद्दल त्याच्या पालकांनीच सांगितले होते. धोनीच्या पालकांनाही सांधेदुखीचा त्रास होता, त्यांच्यावर वंदनसिंह यांनीच उपचार केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावरही उपचार सुरू असल्याचे वंदनसिंह सांगतात. धोनीच्या आई-वडिलांना याच औषधामुळे बराच आराम मिळाला आहे. त्यामुळेच आता धोनीदेखील वंदनसिंह यांच्याकडून उपचार घेत आहे.