MS Dhoni, IND vs NZ Video: भारतीय संघाने घरच्या मैदानावर झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत धमाकेदार विजय मिळवला. भारतीय संघाने पाहुण्यांना व्हाईटवॉश देत, मालिका ३-० ने जिंकली. न्यूझीलंड विरूद्धची आगामी मालिका उद्यापासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) चा समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना पुन्हा एकदा टी२० संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे आणि हार्दिक पांड्याकडे टी२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून सूर्यकुमार यादव संघाचा उपकर्णधार असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रांची येथे होणार असून या शहरात लोकल बॉय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्प्राईज दिले.
न्यूझीलंड विरूद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ रांचीला पोहोचला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी२० सामना २७ जानेवारीला रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय टी२० संघ बुधवारी रांचीला पोहोचला. भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत क्लीन स्वीप केले. आता २७ जानेवारी पासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी२० मालिका रंगणार आहे. त्यासाठी आज नव्या दमाच्या टीम इंडियाने कसून सराव केला. याच दरम्यान, रांचीचा लोकल बॉय धोनीने अचानक ट्रेनिंग सत्राला उपस्थिती लावली आणि साऱ्यांना भेटला. यावेळी नव्या दमाच्या टीम इंडियाने त्याच्याकडून महत्त्वाच्या टिप्स घेतल्या आणि त्याच्याशी मनसोक्त गप्पादेखील मारल्या.
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी बुधवारी रांचीला पोहोचला. पहिला सामना रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. रांचीला पोहोचताच हार्दिकने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. हार्दिकने या भेटीचे दोन फोटो शेअर केले आहेत आणि त्यासोबत 'शोले 2 लवकरच येत आहे' असे लिहिले. या फोटोमध्ये हार्दिकने धोनीसोबत जय-वीरू पोज दिली. शोले चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची भूमिका होती आणि हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. जय-वीरूच्या मैत्रीवर आधारित हा चित्रपट खूप गाजला होता.
भारताचा न्यूझीलंड विरूद्ध टी२० संघ: हार्दिक पांड्या ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उम्रान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.