IPL 2023, CSK Captain : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) कर्णधारपदावरून रंगलेलं नाट्य सर्वांनी पाहिले. आयपीएल २०२२ला सुरुवात होण्याआधीच महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर CSK ने ही जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Ravindra Jadeja) सोपवली. पण, चेन्नईचा हा प्लान फसला अन् त्यांना काही खास कामगिरी करता आली नाही. स्पर्धेच्या मध्यंतरात पुन्हा धोनीची एन्ट्री झाली, परंतु तोपर्यंत स्पर्धेतील आव्हान टीकवणे हातातून निसटले होते. CSKला गुणतालिकेत तळाला रहावे लागले. आता चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 ची तयारी सुरू केली आहे. पण, कर्णधार कोण? या अनुत्तरीत प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं.
आयपीएलच्या मागच्या पर्वात उडालेला गोंधळ पाहता CSK ने यंदा सावध पवित्रा घेताना IPL 2023च्या सुरुवातीलाच कर्णधार कोण असेल हे ठरवले आहे. रवींद्र जडेजा CSKच्या व्यवस्थापनाशी नाराज असल्याची चर्चा आहे, कारण त्याने सोशल मीडियावरील फ्रँचायझीच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. तो ट्रान्सफर विंडो प्रक्रीयेतून दुसऱ्या फ्रँचायझीच्या संपर्कात असल्याची चर्चाही सुरू आहे. त्याच्या जागी CSK पुन्हा सुरेश रैनाला ताफ्यात घेऊ शकेल, असेही म्हटले जात आहे. पण, या सर्व घडामोडी घडतील तेव्हा घडतील. सध्या आयपीएल २०२३मध्ये महेंद्रसिंग धोनीच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असेल, हे CEO काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले.
चेन्नईच्या संघावर धोनीची किती पकड आहे, हे सर्वांना माहित्येय. विश्वनाथन म्हणाले, आमच्या निर्णयात कोणताच बदल नाही, कर्णधार बदलणार असे आम्ही कधीच म्हटले नाही. धोनीच आमचा कर्णधार असेल.