Join us  

MS Dhoni: धोनी IPL ला देखील करणार अलविदा? FB Live मध्ये करणार मोठी घोषणा

धोनी कधी, कुठे आणि किती वाजता करणार घोषणा... वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 8:08 PM

Open in App

MS Dhoni Facebook Live: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी बहुतेक वेळा सोशल मीडियापासून दूरच राहणे पसंत करतो. मात्र त्याने त्याच्या फेसबुक पेजवर आज एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. धोनी २५ सप्टेंबरला म्हणजेच उद्या फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. धोनीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे. २५ सप्टेंबरला दुपारी २ वाजता लाईव्ह येऊन मी ती अपडेट सांगेन. मला आशा आहे की तुम्ही सारे जण नक्की मला ऐकायला FB Live बघाल.' धोनीच्या या फेसबुक पोस्टमुळे आता तो इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घोषणा (IPL retirement) करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

MS धोनीने दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. अशा परिस्थितीत धोनी IPL 2023 मध्ये शेवटच्या वेळी मैदानात उतरेल, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून आहे. धोनी IPLमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे बरेच वर्ष नेतृत्व करतो. त्यामुळे ही घोषणा IPL बाबत असण्याची दाट शक्यता आहे.

धोनीने CSKला चार वेळा मिळवून दिली IPL ट्रॉफी

IPLच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेली चेन्नई सुपर किंग्स धोनीच्या नेतृत्वाखाली चार वेळा चॅम्पियन बनली आहे. 2022 मध्ये IPLमध्ये संघाची कामगिरी काही खास नव्हती. हंगामाच्या सुरुवातीला धोनीने रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते, मात्र संघाच्या सततच्या पराभवामुळे संघाचे नेतृत्व पुन्हा धोनीकडे आले. याशिवाय, सीझनच्या शेवटच्या सामन्यानंतर धोनीने सांगितले होते की तो IPL 2023 मध्येही CSK कडून खेळणार आहे.

IPL 2023 मध्ये होम आणि अवे व्हेन्यूचा नियम पुन्हा लागू केला जात आहे. अशा परिस्थितीत धोनी CSK च्या घरच्या मैदानावर खेळून निवृत्तीची घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. धोनी शेवटचा IPL 2019 मध्ये चेन्नईत खेळला होता. यानंतर IPL 2020 चा संपूर्ण हंगाम यूएईमध्ये खेळला गेला. 2021 चा हंगाम अर्धा भारतात आणि अर्धा UAE मध्ये झाला. तर IPL 2022 च्या पहिल्या भागात सामने फक्त मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी खेळले गेले, तर स्पर्धेचा दुसरा भाग कोलकाता आणि गुजरात मध्ये झाला. अशा वेळी यंदा चेन्नईत धोनी शेवटचा सामना खेळून IPL ला अलविदा म्हणणार अशीच चर्चा आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२२फेसबुकचेन्नई
Open in App