चेन्नई: 'जेव्हा संघाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपविण्यात आली होती, तेव्हा मी त्याला म्हटले होते की, मी दिलेला प्रत्येक सल्ला मानलाच पाहिजे असे नाही. तू तुझे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेस. शक्य होईल तितके मी दूर राहण्याचा प्रयत्न करेन, असेही सांगितले होते,' असे चेन्नई संघाचा दिग्गज यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने म्हटले. रविवारी मुंबईविरुद्ध विजय मिळविल्यानंतर धोनीने एका मुलाखतीत म्हटले की, 'ऋतुराज दीर्घकाळापासून संघाचा सदस्य आहे. त्याचा स्वभाव खूप चांगला असून तो खूप शांतही आहे. तसेच तो सहनशीलही आहे. त्यामुळेच आम्ही त्याला कर्णधार म्हणून निवडले. अनेकांना वाटले की, मी पडद्यामागून निर्णय घेत होतो. पण, खरं म्हणजे तोच सामन्यादरम्यान ९९ टक्के निर्णय घेत होता.'
बदललेल्या खेळाविषयी धोनी म्हणाला की, 'फलंदाज हल्ली धोका पत्करण्यास घाबरत नाही. फलंदाज तांत्रिक क्रिकेट फटक्यांसह काही आक्रमक फटकेही खेळतात, तसेच ते आपल्या फटक्यांच्या निवडीमध्येही सुधारणा करत आहेत. मी त्यांच्याहून वेगळा नाही. मलाही माझ्यामध्ये बदल करावे लागतील. ज्या क्रमांकावर मी फलंदाजी करतो, तिथेहे हे खूप महत्त्वाचे आहे. आम्ही ज्याप्रकारे २००८ मध्ये टी-२० क्रिकेट खेळलो आणि याप्रकारे मागच्या वर्षी यपीएलमध्ये खेळलो, यामध्ये खूप फरक आहे.'
४३ वर्षीय धोनीने केले प्रभावित : हेडन
'वयाच्या ४३व्या वर्षी धोनीने दाखवलेली चपळता जबरदस्त आहे. त्याने अत्यंत वेगाने केलेला यष्टिचीत चकित करणार ठरला. त्याने आपल्या खेळाने प्रभावित केले,' असे ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने म्हटले. धोनीने रविवारी मुंबईच्या सूर्यकुमार यादवला नूर अहमदच्या गोलंदाजीवर केवळ ०.१२ सेकंदामध्ये यष्टिचीत केले. याविषयी हेडन म्हणाला की, 'धोनी खूप आक्रमक पद्धतीने खेळला. नूर अहमद लेग साइडने गोलंदाजी करत होता आणि अशा परिस्थितीत यष्टिचीत करणे कठीण बनते. पण, धोनीने कमाल केली. जबरदस्त वेग, शानदार हात आणि चांगली दृष्टी. तो अजूनही तोडीस तोड आहे.'
Web Title: MS Dhoni told Ruturaj Gaikwad that its not like he should follow all advice and suggestions from MSD
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.