ms dhoni and virat kohli । मुंबई : सध्या इंडियन प्रीमिअर लीगचा (IPL 2023) थरार रंगला आहे. आयपीएलच्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग यंदा जिओ सिनेमावर होत आहे. आतापर्यंत आयपीएलचे एकूण ५ सामने झाले असून जिओ सिनेमावर सामना पाहणाऱ्यांची संख्या समोर आली आहे. या आकडेवारीनुसार महेंद्रसिंग धोनीची छोटीशी खेळी विराट कोहलीच्या मॅचविनिंग खेळीवर भारी पडल्याचे दिसत आहे. आयपीएल २०२३ मधील सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला गेला.
व्ह्यूवरशिपच्या यादीत धोनीचा जलवा दरम्यान, धोनीच्या चेन्नईला पराभूत करून गतविजेत्या गुजरातने विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात कर्णधार धोनीने ७ चेंडूत १४ धावांची नाबाद खेळी केली. धोनीने एक षटकार आणि एक चौकार ठोकून चाहत्यांना जागे केले होते. धोनी फलंदाजी करताना जिओ सिनेमावर तब्बल १.६ कोटी लोक त्याला लाईव्ह पाहत होते. तर व्ह्यूवरशिपच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माचा नंबर लागतो. तिलक वर्माने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध ८४ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्याच खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीसमोर १७२ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले होते.
दरम्यान, जिओ सिनेमावरील व्ह्यूवरशिपच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर किंग कोहली आहे. त्याने काल मुंबई इंडियन्सविरूद्ध मॅचविनिंग खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. विराटने ४९ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करून मुंबईला पराभवाचा धक्का दिला. खरं तर विराट कोहली फलंदाजी करत असताना जिओ सिनेमावर तब्बल १.२ कोटी लोक सामना पाहत होते.
IPL २०२३च्या सुरूवातीच्या सामन्यांमधील सर्वाधिक व्ह्यूवरशिप -
- महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करताना - १.६ कोटी
- तिलक वर्मा फलंदाजी करताना - १.४ कोटी
- विराट कोहली फलंदाजी करताना - १.३ कोटी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"