रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी सुद्धा महेंद्रसिंग धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी राजकारणात प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. महेंद्रसिंग धोनीने भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यादरम्यान काढण्यात आलेला फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार दीपक प्रकाश, रांचीचे आमदार सीपी सिंह आणि कानकेचे आमदार सामरी लाल यांनी महेंद्रसिंग धोनीची रांची विमानतळावर भेट घेतली. ही भेट हा निव्वळ योगायोग असल्याचे बोलले जात आहे. मात्र, काही जणांकडून हे फोटो पाहून महेंद्रसिंग धोनी राजकारणात एन्ट्री करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांचे रांचीमध्ये आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे नेते विमानतळावर उपस्थित होते. तेव्हा महेंद्रसिंग धोनी सुद्धा विमानतळावर उपस्थित होता. यादरम्यान महेंद्रसिंग धोनीने तिन्ही नेत्यांची भेट घेतली. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यासोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर धोनी राजकारणात एन्ट्री करणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
याआधी महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमधून निवृत्तीनंतर घेतल्यानंतर त्याला राजकारणात येण्याची पहिली ऑफर भारतीय जनता पक्षाने (भाजप) दिली होती. झारखंड भाजप युनिटने ही ऑफर दिली होती. त्यावेळी भाजप नेते खासदार संजय सेठ म्हणाले होते की, धोनीची इच्छा असेल तर तो रांचीला आल्यावर त्याच्याशी बोलले जाईल. धोनीच्या इच्छेवर सर्व काही अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.