T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाचं (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान आता आकडेवारीवरच अवलंबून असणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. तर भारताचे उर्वरित तीन सामने अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड विरुद्ध होणार आहेत. भारतीय संघानं हे तिनही सामने जिंकले तरीही भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल असं नाही. यासाठी संघाला चांगल्या रनरेटनं सामने जिंकावे लागणार आहेत. नेट रनरेटच्या जोरावर भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं गणित अवलंबून असणार आहे. यातच भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर माजी क्रिकेटपटूंकडून टीका केली जात आहे. यात भारतीय संघ एकजुटीनं खेळत नसल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय संघाकडे अनेक मोठे खेळाडू आहेत आणि सपोर्ट स्टाफही तगडा आहे. पण हे सर्व वेगवेगळ्या गटात विभागले गेले आहेत. संघात एकजूट नाही, अशी टीका केली जात आहे. इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसर यानं कर्णधार विराट कोहलीनं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मेन्टॉर महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबत एकत्र बसून रणनिती ठरवायला हवी, असा सल्ला दिला आहे. त्यांना लवकरच अडचणींवर मात करावी लागणार आहे, असंही तो म्हणाला.
"विराटकडे सध्या सर्वोत्तम ११ खेळाडू नाहीत. त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. विराट, रवी आणि धोनी यांना एकत्र यावं लागणार आहे आणि अडचणी सोडवाव्या लागणार आहेत. मैदानातील रणनितीत बदल करण्याची गरज आहे. भारताला अजूनही उपांत्य फेरीत स्थान प्राप्त करण्याची संधी आहे. आताही परिस्थिती बदलू शकते. हे सारं काही विराट, रवी शास्त्री आणि धोनी यांच्यावर अवलंबून आहे. मला वाटतं हे तिघंही सध्या एकत्र नाहीत", असं माँटी पानेसर म्हणाला.
भारताचे माजी क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांनीही भारतीय संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे आणि एक मोठं विधान केलं आहे. "भारतीय संघाचं प्लानिंग पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहे. संघ घाबरुन खेळतोय हे स्पष्ट दिसून येत आहे. रोहित शर्मानं सलामीला धावा केल्या आहेत आणि तुम्ही त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवता. त्यातून असं दिसलं की तुम्ही त्याला ट्रेंट बोल्टपासून वाचवत होता. ही चांगली गोष्ट नाही. कोहलीनं तिसऱ्या क्रमांकावर चांगल्या धावा केल्या आहेत आणि तो चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. मला वाटतं संघात खूप संभ्रम आहे. धोनी संघाचा मेन्टॉर आणि रवी शास्त्री प्रशिक्षक अशी एक वेगळीच खिचडी ड्रेसिंग रुममध्ये झाली आहे", असं मनिंदर सिंग म्हणाले.