इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना उत्कंठावर्धक ठरला. MS Dhoni च्या चेन्नईला RCB ने पराभूत केले आणि प्ले ऑफमधील चौथे स्थान पक्के केले. या सामन्यात RCB ला फक्त विजय पुरेसा नव्हता, तर त्यांना नेट रन रेटचं गणितही गाठायचं होतं. यश दयालने अखेरच्या षटकांत फक्त विजयच पक्का केला नाही, तर नेट रन रेटचं गणितही गाठून दिलं आणि बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. पण, चेन्नई सुपर किंग्सचे सपोर्टरच्या मनात पराभवाची नव्हे तर वेगळीच भीती होती. ती म्हणजे हा धोनीचा शेवटचा सामना तर नसेल...
विराट कोहली ( ४७) व फॅफ ड्यू प्लेसिस ( ५४) यांनी ७८ धावांची भागीदारी करून दिली. कॅमेरून ग्रीन ( ३८) व रजत पाटीदार( ४१) यांनी २८ चेंडूंत ७१ धावा चोपल्या. दिनेश कार्तिक ( ६ चेंडूंत १४ धावा ) आणि ग्लेन मॅक्सवेल ( ५ चेंडूंत १६ धावा) यांनी झटपट धावा केल्या. ग्रीन १७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला आणि बंगळुरूने ५ बाद २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईला ७ बाद १९१ धावाच करता आल्या आणि २७ धावांनी त्यांचा पराभव झाला. चिन रवींद्र व अजिंक्य ( ३३) यांनी ६६ धावांची भागीदारी केली. रचीन ३७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांवर रन आऊट झाल्याने मॅच फिरली.
महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा ( ४२) यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला, परंतु २७ धावांनी त्यांची हार झाली. त्यांना प्ले ऑफचे तिकीट पक्के करण्यासाठी ९ धावा कमी पडल्या. या सामन्यानंतर बंगळुरूच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. पण, महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंना हात न मिळवताच पेव्हॅलियनमध्ये परतल्याने त्याच्यावर टीका होऊ लागली. पण, धोनीनं असं का केलं, हे समोर आलं आहे. RCB च्या खेळाडूंना हस्तांदोलन करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी बराच वेळ मैदानावर उभा होता. पण, RCB चे सेलिब्रेशन सुरू होतं आणि त्यामुळे धोनीने ड्रेसिंग रुममध्ये जाणे पसंत केले. त्याने RCB च्या सपोर्ट स्टाफचे मात्र अभिनंदन केले.