२०२३ चा वन डे वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे... २०११ नंतर भारतात वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होतेय आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. रोहितने काही दिवसांपूर्वी २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळता न आल्याची खंत बोलून दाखवली होती. रोहित त्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य नव्हता... पण, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २००८ ते २०१२ या कालावाधीत टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य असलेल्या राजा वेंकट ( Raja Venkat) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
RevSportzला दिलेल्या मुलाखतीत वेंकट यांनी २०११च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माला न निवडण्यामागे तेव्हाचा कर्णधार महेंद्रसिंग होता असा गौप्यस्फोट केला आहे. धोनीला संघात पियूष चावला याला खेळवायचे होते आणि त्याच्यासाठी रोहितचे नाव वगळले गेले. कृष्णमाचारी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने रोहितची निवड केली होती आणि त्याआधी तीन वर्ष रोहित वन डे संघाकडून खेळला होता. पण, धोनीने चावलाला संघात घेतले. चावलाने त्या वर्ल्ड कप स्पर्धेत ३ सामन्यांत ४ विकेट्स घेतल्या.
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी तीन वर्ष रोहित वन डे संघाचा नियमित सदस्य होता आणि २०११ च्या वर्ल्ड कपच्या एक महिन्याआधी त्याला संघातून वगळले गेले. यावर वेंकट म्हणाले, ''जेव्हा आम्ही संघ निवडीसाठी बसलो होतो, तेव्हा रोहित हा आमच्या स्कीममध्ये होता. यशपाल शर्मा आणि मी त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत होतो, तेव्हा भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर होता. आम्ही १ ते १४ जणांची नावं निवडली अन् ती पॅनेलने मान्य केली. १५व्या क्रमांसाठी रोहितचं नाव होतं. गॅरी कर्स्टन यांनाही टीम योग्य वाटत होती, परंतु कर्णधाराला पियूष चावला संघात हवा होता. मग कर्स्टन यांनी लगेच यू टर्न मारला अन् धोनीला पाठींबा दिला. त्यानंतर रोहितचे नाव संघातून वगळले गेले. धोनीने त्याचं मत मांडण्याआधी निवड समितीची पसंती रोहितच्या नावावरच होती.''