चेन्नई : सध्याच्या घडीला आयपीएल फार चर्चेत आले आहे. कारण प्रत्येक संघ काही खेळाडूंना नारळ देत आहेत, तर काहींना आपल्या संघात कायम ठेवत आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा संघ सध्या कर्णधार महेद्रसिंग धोनीला नारळ देण्याचा विचार करत आहे, अशी एक चर्चा सुरु झाली आहे.
सध्याच्या घडीला धोनी क्रिकेटपासून लांब आहे. इंग्लंडमधील विश्वचषकानंतर धोनी एकही सामना खेळलेला नाही. त्याचबरोबर धोनीला भारताच्या ट्वेन्टी-२० संघापासूनही दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये धोनी खेळणार की नाही, याबाबत काहींच्या मनात प्रश्नचिन्ह आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये आम्ही पाच खेळाडूंना संघातून बाहेर काढत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. या ट्विटवर एका चाहत्याने, चेन्नईचा संघ धोनीला नारळ देण्याचा तयारी सुरु केली आहे, असे म्हटले आहे.
चाहत्याच्या या ट्विटनंतर चेन्नईचा संघ खडबडून जागा झाला. त्यांनी या चाहत्याच्या ट्विटला उत्तर दिले आहे. चेन्नईच्या संघाने म्हटले आहे की, धोनी हा संघाचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे तुमच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे.