मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सध्या सुरू आहे. धोनी यापुढे क्रिकेटच्या मैदानात दिसणार की नाही, यावर चर्चा सुरू आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, आता तो एका नव्या रूपात चाहत्यांच्या भेटीला येणार असून या नवीन रूपात धोनी देशाची शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
विश्वचषकानंतर भारतीय सेनेसोबत सराव करण्यासाठी धोनी काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये होता. या वेळी त्याने सेनादलातील जवानांचे काम जवळून पाहिले आहे आणि या गोष्टीचाच फायदा धोनीला होणार आहे. धोनी टीव्हीवर एक मालिका घेऊन येणार असल्याचे बोलले जात असून या मालिकेमध्ये भारतीय सैनिकांची शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे.
सैनिकांच्या शौर्याला फारशी प्रसिद्धी मिळत नाही. किंबहुना जवानांना तशी अपेक्षाही नसते. मात्र, आपल्या सैनिकांचे शौर्य सर्वसामन्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि भारतीय सैनिकांनी कशाप्रकारे मर्दुमकी गाजवली आहे, हे दाखवण्याचा या मालिकेचा उद्देश असेल. या मालिकेसाठी धोनीची निवड केल्याचे म्हटले जात आहे. सध्या या मालिकेची संहिता लिहिण्याचे काम सुरू असून त्यानंतर काही दिवसांमध्येच या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येणारआहे.