भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वन डे वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. वेस्ट इंडिज ( Away) , बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज ( Home) मालिकेत तो खेळला नाही. पुढील ऑस्ट्रेलिया व श्रीलंका मालिकेतही त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. 38 वर्षीय धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही सुरू आहेत आणि त्यामुळेच तो ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहेत. पण, चेन्नई सुपर किंग्स ( CSK) चा सहकारी आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनं धोनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल, असं विधान केलं आहे.
''धोनी अजून निवृत्त झालेला नाही. त्यामुळे तो ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळेल. धोनीच्या आतील क्रिकेटपटू संपलेला नाही. घाबरू नका, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, ही धोनीनं आम्हाला दिलेली शिकवण आहे,''असं ब्राव्होनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. धोनीला पर्याय म्हणून टीम इंडिया आणि संघ व्यवस्थापक रिषभ पंतच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. मात्र, पंतला त्यांच्या विश्वासावर खरं उतरता आलेले नाही. तरीही त्याला वारंवार संधी दिली जात आहे.
दरम्यान, ब्राव्होनं शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. ऑक्टोबर 2018मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं, परंतु शुक्रवारी त्यानं आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानं किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप खेळण्यास आवडेल असं सांगताना वेस्ट इंडिजच्या निवड समितीला आपल्या नावाचा विचार करावा, असं सांगितले.