क्रिकेटच्या मैदानातील आपल्या अफलातून कामगिरीशिवाय महेंद्रसिंह धोनी बाईक लव्हर्सच्या यादीतही अगदी टॉपला आहे. अनेकदा तो बाईक राइडिंगचा छंद जोपासतानाही पाहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही धोनीची क्रेझ कायम आहे. त्याची एक झलक पाहायला मिळावी, यासाठी चाहते धडपडत असतात. बऱ्याचदा धोनीही चाहत्यांची मनातली गोष्ट अगदी सहजरित्या पूर्ण करतो. मैदानात असो वा मैदानाबाहेर धोनी आपल्या चाहत्यांचे मन जिंकण्यात माहिर आहे. हीच गोष्ट पुन्हा एकदा त्याने दाखवून दिली आहे.
चाहत्याच्या बाईकवर स्वाक्षरी करताना दिसला धोनी, पुन्हा रंगली त्याच्या साधेपणाची चर्चा
सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो आकर्षक सुपर बाईकसोबत दिसतोय. बाईक दिसली की, त्याबद्दलची धोनीच्या मनात जी उत्सुकता दिसून येते, ती कमालीची असते. ही गोष्ट देखील या व्हिडिओत तुम्हाला दिसून येईल. बाईकसंदर्भातील गोष्टी समजून घेतल्यानंतर धोनी या बाईकवर स्वाक्षरी करतानाही दिसतो. ज्याची बाईक आहे, त्या चाहत्याचा आनंद तर गगनाला भिडला आहेच. पण धोनीनं या अंदाजासह आपल्या अन्य चाहत्यांची मनंही जिंकली आहेत. धोनीच्या साधेपणाची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे.
धोनी अन् त्याचे बाईक्सवरील प्रेम
धोनीच्या ताफ्यातील बाईक कलेक्शनमध्ये अगदी क्लासिक मॉडेल्सपासून ते मॉडर्न जमान्यातील सुपर बाईक्सचे कलेक्शन पाहायला मिळते. क्रिकेटमधील सुपर स्टार होण्याआधीपासून त्याचं बाईकप्रती आकर्षण आहे. वेळोवेळी त्याच्या बाईक प्रेमाची झलकही पाहायला मिळत असते. गॅरेजमध्ये अलिशान SUV चं मोठं कलेक्शन असले तरी धोनी आजही मनात आल्यावर बाईक घेऊन रांचीच्या रस्त्यावरून फिरताना पाहायला मिळते.याशिवाय धोनीच्या बाईक प्रेमाची कल्पना त्याच्या ताफ्यात असलेल्या बाईकवरूनही सहज करता येईल. गेल्या काही वर्षांत त्याने कॉन्फेडरेट X132 Hellcat, Kawasaki Ninja H2, आणि Harley-Davidson Fat Boy सारख्या आयकॉनिक मॉडेल्ससह आपलं बाईक कलेक्शन आणखी खास केले आहे.
पुन्हा तो खेळताना दिसेल, अशी इच्छा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये सातत्याने खेळताना दिसला आहे. आगामी आयपीएलमध्येही त्याने मैदानात उतरावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. धोनी आगामी आयपीएलमध्ये अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात खेळेल, अशीही चर्चा रंगत आहे. तो चेन्नईच्या ताफ्यात दिसणार यात शंका नाही. पण तो प्लेयरच्या रुपात दिसणार की, नव्या जबाबदारीसह संघाला जॉईन होणार ते पाहणे महत्त्वाचे आणि उत्सुकतेचे असेल.