नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. वन डे मालिकेत झालेल्या पराभवानंतर संघाने शानदार पुनरागमन केले आणि कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. खरं तर कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे लोकेश राहुलच्या नेतृत्वात संघ यजमानांविरूद्ध लढत आहे. वन डे मालिका जरी भारतीय संघाने गमावली असली तरी मालिकेतील अखेरचा सामना ईशान किशनने अविस्मरणीय केला. अखेरच्या वन डे सामन्यात किशनने द्विशतक तर विराट कोहलीने शतक ठोकले होते.
दरम्यान, ईशान किशनने वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावले. त्याने अवघ्या 126 चेंडूत 200 धावांचा आकडा गाठला आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली. द्विशतक ठोकणारा किशन हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांनी ही किमया साधली होती. द्विशतक झळकावल्यानंतर ईशान किशन प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याने अलीकडेच वन क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खेळीचे श्रेय मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीला दिले. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड आणि सचिन तेंडुलकर यांच्याकडून खूप काही शिकता आले असे किशनने म्हटले.
ईशान किशनच्या उत्तराने जिंकली मनं याशिवाय भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलताना ईशान किशनने सर्वांची मनं जिंकली. "एमएस धोनीने आम्हाला विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. तो एक महान खेळाडू आहे, जरी मी एमएसने जे काही केले त्यातील 70% जरी केले तरी मला आनंद होईल", अशा शब्दांत किशनने धोनीचे कौतुक केले. तर ईशानने भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे कौतुक करताना म्हटले "वीरेंद्र सेहवागला खेळताना पाहून मी गोलंदाजांना टार्गेट करायला शिकलो. कारण तो ब्रेट ली असो किंवा शोएब अख्तर सगळ्यांविरूद्ध आक्रमक खेळायचा."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"