भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात बीसीसीआयनं एक बदल केला. बीसीसीआयनं आज केलेल्या घोषणेनुसार शार्दूल ठाकूरची ( Shardul Thakur) अंतिम १५ मध्ये एन्ट्री झाली आहे. पण, त्याच्या जागी अक्षर पटेल ( Axar Patel) याला राखीव खेळाडूंमध्ये बसवण्यात आले आहे. हार्दिक पांड्याचा फॉर्म आणि तंदुरुस्ती पाहून त्याला डच्चू मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु आयपीएल २०२१त ११ सामन्यांत १५ विकेट्स घेणाऱ्या अक्षरला राखीव फळीत बसवल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
आयपीएल २०२१ त हार्दिकला १२ सामन्यांत १४.११च्या सरासरीनं १२७ धावा करता आल्या आहेत. त्यात त्यानं एकही चेंडू फेकलेला नाही. त्यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली होती. बीसीसीआयनं आधी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज होते. अक्षर पटेल हा रवींद्र जडेजाला बॅक अप म्हणून संघात होता. अशात हार्दिक हा एकमेव जलदगती अष्टपैलू खेळाडू संघात होता आणि भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारताला जलदगती अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवेल असे संकेत दिले होते.
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा या संघाचा मेंटॉर असणार आहे आणि त्यानं शार्दूल ठाकूरसाठी बीसीसीआयकडे शब्द टाकल्याची चर्चा सुरू आहे. शार्दूलनं गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. त्यामुळे हार्दिक पूर्णपणे तंदुरूस्त न झाल्यास शार्दूल ठाकूर हा सक्षम पर्यात विराट कोहलीकडे असणार आहे. शार्दूलनं आयपीएल २०२१त १५ सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या आहेत आणि चेन्नई सुपर किंग्स जेव्हा जेव्हा संकटात सापडलाय , तेव्हा शार्दूल धाऊन आला आहे. इंग्लंड दौऱ्यावरही कसोटीत शार्दूलनं फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
- भारतीय संघ - विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
- राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल
- नेट गोलंदाज - आवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद, के गौथम.