वेस्ट इंडिजचा ४१ वर्षीय तरूण फलंदाज ( होय तरूण) ख्रिस गेल यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ३८ चेंडूंत ६७ धावांची खेळी केली आणि यासह त्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४००० धावांचा पल्लाही पार केला. ट्वेंटी-२०त १४ हजार धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. गेलच्या या स्फोटक खेळीत ७ षटकार व ४ चौकारांचा समावेश होता. गेलनंतर सर्वाधिक धावांच्या यादीत वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड १०,८३६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पाकिस्तानचा शोएब मलिक ( १०७४०), ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ( १००१७) आणि भारताचा विराट कोहली ( ९९९२) यांचा क्रमांक येतो. गेलच्या या विक्रमी खेळीनंतर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचं जून ट्विट व्हायरल होत आहे. यात बरं झालं आपण यष्टिरक्षक आहोत, असे मत धोनीनं व्यक्त केलं होतं... पण, धोनीनं असं का म्हटलं होतं हे माहित्येय का?
२०१३च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) एका वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली होती आणि तो रेकॉर्ड विंडीजच्या ख्रिस गेलनं नोंदवला होता. तेव्हा गेल विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( RCB) संघाकडून खेळायचा अन् पुण वॉरियर्स इंडिया ( PWI) संघाविरुद्ध त्यानं स्टेडियमन दणाणून सोडलं होतं. गेलच्या या खेळीची जेवढी चर्चा रंगली, तेवढीच चर्चा महेंद्रसिंग धोनीच्या ट्विटचीही झाली.
RCBच्या गेलनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नोंदवला. गेलनं पुणे संघाविरुद्धच्या या सामन्यात ३० चेंडूंत शतक पूर्ण केलं होतं. त्याचा हा झंझावात १७५ धावांवर थांबला. गेलनं या खेळीत ६६ चेंडूंत १७ षटकार व १३ चौकार खेचले आणि RCBला २६३ धावांची मजल मारून दिली. पुण्याचा संघ १३३ धावा करू शकला अन् RCBनं १३० धावांनी विजय मिळवला.
गोलंदाजाची चिंधड्या उडवताना गेलला पाहून महेंद्रसिंग धोनीनं एक ट्विट केलं. त्यात त्यानं लिहिलं की,''आयुष्यात योग्य निर्णय घेणं महत्त्वाचे असते... गेलची फटकेबाजी पाहून मी यष्टिरक्षक होण्याचा घेतलेला निर्णय हा योग्यच होता, असे मला वाटते.''