मध्य प्रदेशमधील झाबुआमध्ये बर्ड फ्ल्यू आढळल्यामुळे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. धोनीने ज्या गावातून कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर दिली होती, त्या गावातील पोल्ट्री फॉर्मच्या कोंबड्या मारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.
मध्यप्रदेशच्या झाबुआतील रुडीपाडा गावात बर्ड फ्ल्यूमुळे हजारो कोंबड्यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. याचा अहवाल आज आला असून प्रशासनाने कडकनाथ कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मकडेही मोर्चा वळविला आहे. कडकनाथ कोंबड्या मारण्यात येत आहेत. याच गावातील धोनीने एका शेतकऱ्याकडून रांची येथील फार्म हाऊससाठी २००० कोंबड्यांची ऑर्डर दिली होती. विनोद मेधाला असे या शेतकऱ्याचे नाव असून धोनीच्या मॅनेजरने त्याच्याशी संपर्क साधून कोंबड्यांची ऑर्डर दिली आहे. १५ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्याला ही ऑर्डर द्यायची होती.
आता या शेतकऱ्याच्या कोंबड्याही मारण्यात येणार असून यामुळे धोनीने नेलेल्या कडकनाथ कोंबड्यांही बर्ड फ्ल्यूच्या सावटाखाली येण्याची शक्यता आहे.
''धोनीच्या फार्म हाऊसमधील मॅनेजरने तीन महिन्यांपूर्वी कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला. पाच दिवसांपूर्वी त्यांनी २००० कोंबड्यांची ऑर्डर दिली. १५ डिसेंबरपर्यंत या कोंबड्या रांचीला पोहचवायच्या आहेत. यासाठीचे पैसे धोनीच्या टीमने दिले आहेत,'' अशी माहिती विनोद मेधा यांनी दिली होती. मध्य प्रदेशातील कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथ कोंबडी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी असणाऱ्या डॉ. चंदन कुमार यांनी The New Indian Expressकडे या वृत्ताला दुजोरा दिला. ''धोनीच्या फार्म हाऊसचं मॅनेजमेंट सांभाळणारा कुणाल गौरव याने काही दिवसांपूर्वी रांचीत कडकनाथ कोंबड्यांबद्दल चौकशी केली होती. मध्य प्रदेशात कोणाकडे मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडी मिळेल याचा आम्ही तपास केला. त्यानंतर विनोद मेधा यांचं नाव,''असे चंदन कुमार यांनी सांगितले. रांची येथील आपल्या ४३ एकराच्या फार्म हाऊसवर धोनीने सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरु केला आहे.
तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. सोमवारपासून येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली. दूध 55 रु. लिटर विकले जात आहे. यात कसल्याही प्रकारची भेसळ नाही. पंजाबवरून एकूण 60 गाई आणण्यात आल्या होत्या. जर्सी आणि शहवाल जातीच्या गाईंच्या दूधाची विक्री बाजारात केली जात आहे. सध्या अपर बाजार, लालपूर, वर्धमान कंपाउंड येथे विक्री केली जात आहे. याशिवाय पीपी कंपाउंडमध्येदेखील लवकरच काउंटर सुरू करण्यात येतील.