Join us  

'माही'साठी काहीही; आता टीम इंडियात कुणालाही 7 नंबरची जर्सी मिळणार नाही!

2017मध्ये दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची 10 क्रमांकाची जर्सीही कायमची निवृत्त करण्यात होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 10:50 AM

Open in App

टीम इंडियाचा दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आयकॉनिक नंबर 7 जर्सी यापुढे इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला उपलब्ध होणार नाही. धोनीच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर सुमारे ३ वर्षांनी बीसीसीआयने हा निर्णय घेतला. धोनीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्या टी-शर्टवर घातलेला नंबर निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. 2017मध्ये दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची 10 क्रमांकाची जर्सीही कायमची निवृत्त करण्यात होती.

बीसीसीआयने अहवालात म्हटलं की, धोनीची आयकॉनिक क्रमांक 7 जर्सी इतर कोणताही भारतीय क्रिकेटर परिधान करणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून धोनीच्या निवृत्तीनंतर तीन वर्षांनी, धोनीच्या खेळातील योगदानामुळे त्याने परिधान केलेला नंबर रिटायर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007मध्ये T20 विश्वचषक, त्यानंतर 2011मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर 2013मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. 2014 मध्ये धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली होती.

बीसीसीआयने पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना दिली माहिती-

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना, विशेषत: पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना तेंडुलकर आणि धोनीशी संबंधित क्रमांकाचा पर्याय नसल्याचे सांगितले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन खेळाडूंना एमएस धोनीची 7 नंबरची जर्सी निवडू नका असे सांगण्यात आले होते. खेळातील योगदानाबद्दल बोर्डाने टी-शर्ट निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पदार्पण करणार्‍याला 7 क्रमांक मिळू शकत नाही आणि 10 क्रमांक आधीच उपलब्ध क्रमांकांच्या यादीतून बाहेर आहे.

टीम इंडियाचा टी-शर्ट क्रमांक निवडण्याचा नियम काय आहे?

बीसीसीआयच्या निर्णयामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचे पर्याय मर्यादित झाले आहेत. नियमानुसार, आयसीसी खेळाडूंना 1 ते 100 मधील कोणतीही संख्या निवडण्याची परवानगी देते. पण भारतात पर्याय मर्यादित आहेत. सध्या, टीम इंडियाच्या नियमित खेळाडू आणि स्पर्धकांसाठी सुमारे 60 संख्या चिन्हांकित आहेत. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एखादा खेळाडू जवळपास वर्षभर संघाबाहेर असला तरी त्याचा नंबर कोणत्याही नवीन खेळाडूला दिला जात नाही. याचा अर्थ असा की अलीकडील पदार्पण खेळाडूकडे निवडण्यासाठी सुमारे 30 संख्या आहेत.

शार्दुल ठाकूरच्या जर्सीवरुन झाला होता वाद-

2017मध्ये मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने 10 नंबर परिधान करून मैदानात प्रवेश केला होता. यानंतर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले. काही चाहत्यांनी असेही सांगितले की शार्दुल सचिन बनण्याचा प्रयत्न करत आहे. यावर रोहितने शार्दुलची खिल्लीही उडवली होती. यानंतर बीसीसीआयने हस्तक्षेप केल्यानंतर ठाकूर यांनी 54 नंबरचा टी-शर्ट परिधान केला. सध्याच्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली 18 क्रमांकाचा टी-शर्ट घालतो आणि रोहित शर्मा 45 क्रमांकाचा टी-शर्ट घालतो. जो सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय टी-शर्ट नंबर आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीबीसीसीआयसचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघ