रांचीः भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आगामी वेस्ट इंडिय दौऱ्यावर जाणार की नाही? निवड समिती त्याला संघात स्थान देणार की विश्रांती देऊन निवृत्ती घेण्याचे संकेत देणार? असे अनेक प्रश्न सध्या धोनी चाहत्यांच्या डोक्यात सुरू आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत संथ खेळ करणाऱ्या धोनीवर सडकून टीका झाली आणि त्यामुळेच त्यानं आता थांबावं, असा मतप्रवाह तयार झाला आहे. 2007 मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीचं टीम इंडियासाठीचं योगदान कोणत्याही मापात मोजता येणारे नाही.
'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला'
पण, आता त्याच्या निवृत्तीच्याच चर्चा अधिक आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला फिरकी गोलंदाजांचा सामना करताना अडखळताना पाहिले. पण, टीकाकारांना उत्तर देत 38 वर्षीय धोनीनं भारताच्या वाटचालीत खारीचा वाटा उचलला. त्यानं 273 धावा केल्या आणि भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान धोनीला जातो. पण, त्याच्यावर जिंकण्याची जिद्द हरवल्याचा ठपका लावण्यात आला आहे.
... तर 'या' दिवशी महेंद्रसिंग धोनी खेळणार अखेरचा सामना?
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा येत्या शुक्रवारी होणार आहे. त्यात धोनीला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. धोनीच्या घरच्यांनीही त्याच्या निवृत्तीबाबत आपलं मत व्यक्त केले आहे. धोनीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबीयांनाही धोनीनं आता निवृत्ती स्वीकारावी आणि घरच्यांसोबत रांचीत रहावे, असे वाटते. बॅनर्जी म्हणाले,''मी रविवारी धोनीच्या घरच्यांशी भेट घेतली. त्यांनी सांगितले धोनीनं आता क्रिकेट खेळणं थांबवावं. मी त्यांना त्वरित नकार दिला आणि सांगितले की एक वर्ष तरी धोनीनं खेळावं. त्यानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणं योग्य ठरेल. घरच्यांनी विरोध केला अन् म्हणाले, मग एवढ्या मोठ्या घराची काळजी कोण घेणार. मी त्यांना सांगितले इतकी वर्ष तुम्ही हे घर पाहिलेत मग आणखी एक वर्ष सांभाळ करा.''