मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघाची धुरा समर्थपणे सांभाळली. अनेक कठीण प्रसंगातही त्याने स्वतःवरील नियंत्रण सुटू दिले नाही आणि अगदी शांततने त्या प्रसंगाना तो सामोरे गेला. मागील तीन वर्षांपासून तर निवृत्तीच्या चर्चांनी त्याला हैराण केले. तरीही तो डगमगला नाही, तो कॅप्टन कुलच राहिला. त्यामुळे धोनी इतका कुल कसा, असा प्रश्न अनेकांना अनेकदा पडला असेलच. त्याचे उत्तर स्वतः धोनीनेच दिले.
गेल्या तीन एक वर्षांत निवृत्तीच्या चर्चांमध्ये स्वतःला शांत, तणावमुक्त ठेवणे बरेच कठीण होते. मात्र जीवामुळे माझ्यावरील तणाव कमी झाला. तिचे हसणे, बागडणे अवतीभवती फिरणे यांनी तणाव चटकन नाहीसा होतो, असे धोनीने सांगितले. भारतीय संघाच्या बहुतांश सामन्यांत धोनीला चिअर करण्यासाठी जीवा आई साक्षीसह स्टेडियमवर उपस्थित असलेली अनेकदा पाहायला मिळाली. इंडियन प्रीमिअर लीगच्या जेतेपदानंतर धोनीसोबत ती चषक उंचावण्यासाठीही गेली होती. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांमध्येही ती पॉप्युलर झाली आहे.
तीन वर्षांची असूनही जीवा सर्वकाम काळजीपूर्वक करते असे धोनी सांगतो. तो पुढे म्हणाला,' तिचे आजूबाजूला असणे चांगले वाटते. ती एक इंजिन आहे. सकाळी उठल्यापासून तिची धावपळ सुरू होते. ती जे काही करते ते काळजीपूर्वक असते त्यामुळे आम्हाला तिची चिंता करावी लागत नाही. तिच्यामुळे माझे तणाव नाहीसे होते.'