नवी दिल्ली : रिषभ पंतचे अपयश पाहता 38 महेंद्रसिंग धोनीला संघात पुन्हा बोलवा, अशी मागणी जोर धरत आहे. पंतची कामगिरी अशीच निराशाजनक राहिली तर ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत धोनी खेळताना दिसल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. वन डे वर्ल्ड कपनंतर धोनीनं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघात दिसलेला नाही. पण, धोनीनं खेळावं की नाही यावर मतमतांतर आहेत. मात्र, भारताचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी धोनीला आता बस कर... असा सल्ला दिला आहे.
ते म्हणाले,'' महेंद्रसिंग धोनीच्या मनात नेमकं काय आहे, हे कुणालाही माहित नाही. भारतीय संघातील त्याच्या भविष्याबद्दल तोच सांगू शकतो, परंतु मला वाटतं तो आता 38 वर्षांचा आहे आणि टीम इंडियानं पुढील विचार करायला हवा. कारण, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंत धोनी 39 वर्षांचा होईल.''
''धोनीचं संघासाठीच्या योगदानाचा मुल्यमापन कुणीच करू शकत नाही. केवळ धावाच नव्हे, तर यष्टिंमागूनही त्यानं संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. संघात त्याचं असणे हे केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर कर्णधाराच्याही फायद्याचे असते. त्याचा अनुभव आणि नेतृत्वगुणाचा संघालाच फायदा मिळतो. पण, आता ती वेळ आली आहे,'' असे गावस्कर यांनी पुढे स्पष्ट केले.
परत ये, परत ये, महेंद्रसिंग धोनी परत ये... चाहत्यांनी केली मागणी
भारताचा युवा यष्टीरक्षक हा सातत्याने फ्लॉप होताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यातही पंतला फक्त चार धावाच करता आल्या. त्यामुळे आता पंतला वगळून धोनीला संघात स्थान द्यायला हवे, अशी मागणी चाहते करत आहेत. धोनी याचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून निवड समितीनंही पंतला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या. पण, पंतच्या सततच्या अपयशानंतर धोनीला परत बोलावण्याची मागणी होत आहे. आफ्रिकेविरुद्ध सामन्यात अपयशी ठरल्यानंतर नेटिझन्सने पंतचा चांगलाच समाचार घेतला.
Web Title: MS Dhoni’s time is up! Sunil Gavaskar insists former Indian skipper should call it quits before ICC World T20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.