भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमानांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात DRSमध्ये झालेल्या चुकांमुळे टीम इंडियाला हार मानावी लागली. कर्णधार रोहित शर्मानंही सामन्यानंतर आपली चूक मान्य केली. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रिषभ पंतच्या चुकांचा पाढा पाहून चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा गजर केला. सोशल मीडियावर धोनीला पुन्हा बोलवा, असा हॅशटॅग चर्चेत राहिला. कॅप्टन कूल धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो एकही सामना खेळलेला नाही आणि सध्या सुरू असलेल्या मालिकेतही त्याचा टीम इंडियात समावेश नाही. क्रिकेटपासून दूर गेलेला धोनी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे.
भारत दौऱ्यावर आलेला बांगलादेश संघ येथे तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिल्या ट्वेंटी-20त बांगलादेशनं सात विकेट्स राखून टीम इंडियाला पराभूत केले. भारताने ठेवलेले 149 धावांचे लक्ष्य बांगलादेशनं मुश्फिकर रहीमच्या नाबाद 60 धावांच्या खेळीवर पार केले. बांगलादेशनं प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त भारताला पराभूत करण्याचा पराक्रम केला. मालिकेतील पुढील दोन सामने राजकोट ( 7 नोव्हेंबर) आणि नागपूर ( 10 नोव्हेंबर) येथे होतील. त्यानंतर पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून इंदूर येथे, तर दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे होणार आहे.
या दौऱ्यातील कोलकाता कसोटी ही दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या पुढाकारानं भारतात प्रथमच डे नाईट कसोटी सामना खेळवला जाणार आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळानंही डे नाईट कसोटी खेळण्यास होकार कळवला आहे. त्यामुळे इडन गार्डनवर होणाऱ्या या ऐतिहासिक कसोटीची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या कसोटीत आणखी एक अविश्वसनीय गोष्ट पाहायला मिळणार आहे आणि ती धोनीशी निगडीत आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो विश्रांतीवर आहे. पण, तो इडन गार्डन कसोटीत दिसणार आहे. या कसोटीत धोनी मैदानावर जरी उतरणार नसला तरी त्याच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सामन्यात धोनी पाहुणा समालोचक म्हणून दिसणार आहे. त्यामुळे यावेळी त्याच्या हातात ग्लोज किंवा बॅट नसून माईक असणार आहे.