Join us  

देहबोलीमध्ये मुजोरी पुरेशी नाही, तशी कामगिरी हवी

लढतीमध्ये काही सत्रात चुरस अनुभवाला मिळाली. विशेषता ज्यावेळी मोहम्मद शमी, ईशांत शर्मा व आर. अश्विन यांनी न्यूझीलंडचा पहिला डाव माफक धावसंख्येत गुंडाळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 5:32 AM

Open in App
ठळक मुद्देमहत्त्वाचे म्हणजे दोन्ही डावात भारतीय फलंदाजी ढेपाळली. रोहित, गिल, पुजारा, कोहली, रहाणे व पंत यांचा समावेश असलेल्या भारतीय आघाडीच्या फळीची कामगिरी निराशाजनक ठरली.

अयाज मेमन

विश्व कसोटी चॅम्पियनशिपमधील (डब्ल्यूटीसी) न्यूझीलंड संघाचे जेतेपद भारतीय संघासाठी मोठा धक्का होता. २०१९ वन-डे विश्वकप स्पर्धेनंतर डब्ल्यूटीसीच्या पर्वाला सुरुवात झाल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला जेतेपदासाठी पहिली पसंती होती. कोरोनाच्या काळात गुणांकन पद्धतीत फेरबदल झाला तरी भारतीय संघाच्या वाटचालीवर परिणाम झाला नाही. त्यात पिछाडीवर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नवोदित खेळाडूच्या जोरावर भारताने मालिका जिंकली आणि त्यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध ३-१ ने विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ डब्ल्यटीसी विजेतेपदासाठी फेव्हरिट होता. प्रतिभावान अनुभवी खेळाडू आणि त्यांच्या जोडीला महत्त्वाकांक्षी युवा खेळाडू यापेक्षा डब्ल्यूटीसीचे जेतेपद पटकावण्यासाठी आणखी काय हवे होते ?

याचे उत्तर किवी संघाने अंतिम सामन्यात चार दिवसांमध्ये ८ गड्यांनी विजय मिळवित दिले. पावसामुळे दोन दिवसाचा खेळ वाया गेल्यानंतर आयसीसीवर टीकेची झोड उठली. त्यानंतर केवळ एकच निकाल शक्य भासत होता तो म्हणजे ड्रॉ. पण, न्यूझीलंड संघाने हे चुकीचे ठरविले. पावसाने व्यत्यय निर्माण केला असला तरी किवी संघाने आपली महत्त्वाकांक्षा कायम राखत चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले. शेवटच्या दिवशी योजनाबद्ध खेळ केला. त्यांनी भारताचा दुसरा डाव स्वस्तात गुंडाळला. सामन्यात दुसऱ्यांदा त्यांनी हा पराक्रम केला आणि विजयासाठी आवश्यक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीला विकेट गेल्या असल्या तरी लक्ष्य सहज गाठले.

लढतीमध्ये काही सत्रात चुरस अनुभवाला मिळाली. विशेषता ज्यावेळी मोहम्मद शमी, ईशांत शर्मा व आर. अश्विन यांनी न्यूझीलंडचा पहिला डाव माफक धावसंख्येत गुंडाळला. पण, एकूण लढतीचा विचार करता न्यूझीलंडचे श्रेष्ठत्व दिसून येते. या खडतर खेळपट्टीवर केवळ दोन फलंदाजांना अर्धशतके झळकावता आली. ढगाळ वातावरणामुळे सीम व स्विंग गोलंदाजीला मदत मदत मिळाली. न्यूझीलंड या दोन्ही बाबतीत सरस होता. डावात पाच बळी घेणारा एकमेव गोलंदाज न्यूझीलंडचा काईल जेमिसन होता. पहिल्या डावात भारताने अखेरच्या चार विकेटच्या मोबदल्यात १२ धावा केल्या तर दुसऱ्या डावात १४ धावा केल्या. न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण आघाडी घेता आली.केन विलियमसनची फलंदाज व कर्णधार म्हणून कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने सामन्यात सर्वाधिक धावा केल्या. त्याने पहिल्या डावात झुंजार ४९ धावांची खेळी करताना भारतीय गोलंदाजांना जेरीस आणले. 

भारताचे काय चुकले?

n महत्त्वाचे म्हणजे दोन्ही डावात भारतीय फलंदाजी ढेपाळली. रोहित, गिल, पुजारा, कोहली, रहाणे व पंत यांचा समावेश असलेल्या भारतीय आघाडीच्या फळीची कामगिरी निराशाजनक ठरली. वातावरणाचा विचार करता न्यूझीलंडचा मारा उच्च दर्जाचा होता. पण, भारतीय फलंदाजांची ख्याती बघता त्यांनी खेळाचा दर्जा उंचावणे अपेक्षित होते. अखेरच्या दिवशी फलंदाजी ढेपाळणे मोठी चूक होती. भारताने आणखी तासभर फलंदाजी केली असती तर सामना वाचविता आला असता. पण, सुमार तांत्रिक कौशल्य व दडपणाखाली संयम गमावल्यामुळे भारताचा डाव कोसळला. यापूर्वींच्या दोन मालिकांमधील धाडसी कामगिरीनंतरही भारतीय संघ फायनलमध्ये ढेपाळला.

n सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया देताना कोहलीने खेळाडूंनी अधिक पॅशन दाखविणे अपेक्षित होते असे म्हटले. हे निर्विवाद सत्य आहे, पण एकूण विचार करता कर्णधाराला कळेल की संघात रणनीतीचा अभाव होता. केवळ आक्रमक देहबोली किवी संघाला पराभूत करण्यास पुरेशी नव्हती. इंग्लंडमधील वातावरणात प्रतिस्पर्धी संघाला सामोरे जाण्यास आवश्यक रणनीती, प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक खेळाडूसाठी योजना असणे आवश्यक होते. किंवी संघाने भारतीय खेळाडूंसाठी यावर भर दिला त्यामुळे ते विश्व कसोटी चॅम्पियन झाले.

(लेखक लोकमत वृत्त समुहात कन्सल्टींग एडिटर आहेत) 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ