मुंबई : तब्बल ४१ वेळा रणजी चषक उंचावण्याचा पराक्रम केलेल्या बलाढ्य मुंबई संघावर उपहारापूर्वीच तंबूत जाण्याची नामुष्की ओढावली. रेल्वे संघाच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे ढेपाळलेल्या मुंबईकरांचा पहिला डाव बुधवारी केवळ २८.३ षटकात ११४ धावांत संपुष्टात आला. यानंतर मुंबईकरांनी पुनरागमनाचा चांगला प्रयत्नही केला. मात्र अरिंदम घोषच्या (५२*) नाबाद अर्धशतकामुळे रेल्वेने दिवसअखेर २ धावांनी आघाडी मिळवताना ३७ षटकात ५ बाद ११६ धावा केल्या.
वानेखेडे स्टेडियवर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून रेल्वेने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत यजमानांना त्यांच्याच मैदानावर धडक दिली. स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात बहुतेक पहिल्यांदाच उपहारापूर्वी संपूर्ण संघ बाद होण्याची वेळ मुंबईवर आली. रेल्वेकडून प्रथम श्रेणीचा केवळ तिसरा सामना खेळत असलेल्या मध्यमगती गोलंदाज प्रदीप टी. याने मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १०.३ षटकांत ३७ धावा देत ६ बळी घेतले. प्रदीपची ही रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळीही ठरली.
कर्णधार सूर्यकुमार यादव (३२) मुंबईकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. यानंतर दीपक शेट्टीच्या (३/२०) जोरावर मुंबईने सामन्यात पुनरागमन करण्याचा चांगला प्रयत्न करताना रेल्वेचा अर्धा संघ ४३ धावांवर बाद केला. मात्र अरिंदमने चिवट खेळी करताना ७५ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ५२ धावा करत रेल्वेला आघाडी मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. कर्णधार कर्ण शर्मा (२४*) याने दिवसअखेर नाबाद राहत अरिंदमला चांगली साथ दिली.
----------------------------
संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : २८.३ षटकांत सर्वबाद ११४ धावा (सूर्यकुमार यादव ३९, जय बिस्त २१; प्रदीप टी. ६/३७, अमित मिश्रा ३/४१.)
रेल्वे (पहिला डाव) : ३७ षटकांत ५ बाद ११६ धावा (अरिंदम घोष खेळत आहे ५२, कर्ण शर्मा खेळत आहे २४; दीपक शेट्टी ३/२०.)
ॠतुराजच्या शतकानंतरही महाराष्ट्राचा डाव अडखळला
सलामीवीर ॠतुराज गायकवाड (१०८) याच्या शतकी खेळानंतरही महाराष्ट्राला रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगडविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ७८ षटकात ६ बाद २३८ धावांचीच मजल मारता आली. आघाडीच्या फलंदाजांसह मधली फळी अपयशी ठरल्याने महाराष्ट्राचा डाव अडखळला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात यजमान महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ॠतुराजचा अपवाद वगळता सर्वच प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याने महाराष्ट्र संघ अडचणीत आला. ॠतुराजने १९९ चेंडूत १४ चौकार व ३ षटकारांसह १०८ धावांची संयमी परंतु भक्कम खेळी केली. याशिवाय यष्टीरक्षक विशांत मोरे यानेही दमदार फलंदाजी करताना अखेरपर्यंत नाबाद राहत १०१ चेंडूत ६ चौकारांसह ४९ धावा फटकावल्या. त्याच्या संयमी खेळीमुळे महाराष्ट्राची पडझड रोखली गेली.
याशिवाय मुर्तझा ट्रंकवाला (१०), कर्णधार नौशाद शेख (१२), हुकमी फलंदाज केदार जाधव (१२), अंकित बावणे (२०) आणि चिराग खुराणा (९) हे प्रमुख फलंदाज लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने महाराष्ट्राचा डाव कोलमडला. वेगवान गोलंदाज वीरप्रताप सिंग याने महाराष्ट्राक्या फलंदाजीला खिंडार पाडताना ५६ धावांत ४ खंदे फलंदाज बाद केले. याशिवाय पुनीत दाते आणि अजय जाधव मंडल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
-------------------------
संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र (पहिला डाव) : ७८ षटकात ६ बाद २३८ धावा (ॠतुराज गायकवाड १०८, विशांत मोरे खेळत आहे ४९, सत्यजीत बचाव खेळत आहे १२ अंकित बावणे २०, केदार जाधव १२; वीरप्रताप सिंग ४/५६.)
Web Title: Mumbai all out in just 114 runs in ranji trophy game against railway
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.