नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं(Virat Kohli) आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या सुरुवातीलाच कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केली होती. मंगळवारी कोहलीच्या जागी बीसीसीआय(BCCI)नं रोहित शर्मा(Rohit Sharma) याची टी-२० टीमचा नवीन कॅप्टन म्हणून घोषित केले. आगामी न्यूझीलँडसोबत खेळल्या जाणाऱ्या सामन्यापासून रोहित शर्मा कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळेल.
भारतीय टीमच्या या फेरबदलावर भाष्य करताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मुश्ताक अहमदनं विराट कोहली टी-२० क्रिकेटमधून सन्यास घेईल असं म्हटलं आहे. एका टीव्ही चॅनेलवर तो बोलत होता. मुश्ताक म्हणाला की, जेव्हा कुणी यशस्वी कर्णधार त्याचे कॅप्टनपद सोडण्याची इच्छा व्यक्त करतो त्याचा अर्थ स्पष्ट आहे ड्रेसिंग रुममध्ये सर्वकाही ठीक चालले नाही. यावेळी भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये २ गटबाजी पाहायला मिळत आहे. एक मुंबईचा तर दुसरा दिल्लीचा गट आहे असा दावा त्याने केला.
आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत कॅप्टन म्हणून विराट कोहलीची ही अंतिम स्पर्धा होती. या स्पर्धेत भारताला निराशा मिळाली. भारतीय टीम पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तान, न्यूझीलँडकडून हारली. या पराभवामुळे भारतीय टीम स्पर्धेच्या बाहेर पडली होती. अखेरच्या ३ सामन्यात भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामीबियाला हरवलं आहे. लवकरच कोहली टी-२० क्रिकेट सामन्यातून सन्यास घेईल असं मला वाटतं. इंडियन प्रीमियर लीग(IPL)मध्ये फ्रेंचाइजी टीमकडून तो खेळेल. टी-२० फॉर्मेटबाबत कोहलीला जे काही करायचं होतं त्याने केले असंही मुश्ताक अहमद म्हणाला.
यापूर्वी विश्वकप वेळी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही टीम इंडियात दोन गट झाल्याचं म्हटलं होतं. विराटनं टुर्नामेंटच्या आधीच कॅप्टन पद सोडण्याचा निर्णय घेऊन चुकीचं केले. विराटने हे करायला नको होतं. त्यामुळे विराट कोहलीबाबत असलेला आदर कमी झाला. यावेळी भारतीय टीम दोन गटात विभागल्याचं स्पष्टपणे दिसून येते असं शोएब अख्तरने सांगितले.
BCCI नं काय सांगितले?
रोहित शर्मा यापुढे टी-२० सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्त्व करेल. तर लोकेश राहुल उपकर्णधार असेल. 'रोहित शर्मा यापुढे टी-२० मध्ये संघाचं नेतृत्त्व करेल. ज्यावेळी रोहित ब्रेक घेईल, त्यावेळी संघाची धुरा राहुलकडे असेल,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. १७ नोव्हेंबरपासून टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यांना विश्रांती देण्यात आलेली नाही. भारताच्या १६ सदस्यीय संघात आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेल यांना संधी देण्यात आली आहे.