बंगळुरु : स्टार खेळाडूंच्या पुनरागमनानंतर अत्यंत मजबूत बनलेल्या मुंबई संघाने अपेक्षित कामगिरी करताना विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हैदराबादचा व्हीजेडी पद्धतीने ६० धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह मुंबईने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून २० आॅक्टोबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईला जेतेपदासाठी दिल्ली किंवा झारखंड यापैकी एका संघाविरुद्ध भिडावे लागेल.
पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी २४७ धावांचे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने शानदार सुरुवात केली. मुंबईने २५ षटकात २ बाद १५५ धावा अशी मजल मारल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबला. यानंतर खेळ सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सामनाधिकाºयांनी व्हीजेडी पद्धतीचा अवलंब केला. यानुसार मुंबईला विजयासाठी २ बाद ९६ धावा अशी कामगिरी करणे गरजेचे होते आणि येथेच मुंबईचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला.
विंडीजविरुद्ध जबरदस्त आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉ याने पुन्हा एकदा आपली छाप पाडताना ४४ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांची वेगवान खेळी केली. त्याचवेळी ‘हिटमॅन’ रोहित शर्माला मात्र अपेक्षित खेळी करता आली नाही. तो १७ धावा करुन बाद झाला. फिरकी गोलंदाज मेहदी हसन याने शानदार मारा करताना प्रथम रोहित आणि नंतर पृथ्वीला त्रिफळाचीत केले. परंतु एका बाजूने श्रेयश अय्यरने ५३ चेंडूत नाबाद ५५ धावा करत मुंबईला मजबूत स्थितीत आणले होते. खेळ थांबला तेव्हा अय्यरसह अजिंक्य रहाणे (१७*) खेळपट्टीवर होता. (वृत्तसंस्था)
Web Title: Mumbai beat Hyderabad by 60 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.