मुंबईकर अजिंक्य रहाणे सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शार्दुल ठाकूरच्या घातक गोलंदाजीमुळे आसामचे फलंदाज पहिल्या डावात फ्लॉप झाले आणि संपूर्ण संघ ८४ धावांत आटोपला. यानंतर मुंबईचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मैदानावर वेगळाच दबदबा पाहायला मिळाला.
मुंबईचा कर्णधार रहाणेला जीवनदान मिळाले अन् या सामन्याने अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. मुंबईची धावसंख्या ४ बाद १०२ अशी होती आणि कर्णधार अजिंक्य रहाणेची वैयक्तिक धावसंख्या १८ एवढी होती. यानंतर त्याने चेंडू मिड-ऑनच्या दिशेने टोलावून एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या टोकाला असलेल्या शिवम दुबेने धाव घेण्यास नकार दिला. रहाणे धाव घेण्याच्या इराद्याने खूप पुढे आला होता आणि आसामचा कर्णधार दानिश दासने चेंडू यष्टिरक्षकाकडे फेकला पण तो क्रीझवर परतण्याचा प्रयत्न करत असलेल्या रहाणेला लागला. रहाणे वाटेत आल्यामुळे चेंडू यष्टीरक्षकाकडे पोहोचू शकला नाही.
रहाणे बाद पण...
मग आसामच्या सर्व खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल रहाणेला बाद घोषित करण्यासाठी अपील केली आणि मैदानातील पंचांनी देखील हे मान्य केले. या निर्णयानंतर लगेचच पंचांनी चहाचा ब्रेकही जाहीर केला. मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला त्याच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल बाद देण्यात आले. मात्र काही वेळाने आसाम संघाने अपील मागे घेतले आणि रहाणे पुन्हा फलंदाजीला आला.
नियमांनुसार पुढचा चेंडू टाकण्यापूर्वी बाद करण्याची अपील मागे घ्यावी लागते आणि पंचांनी याचा स्वीकार केल्यास फलंदाज फलंदाजीला परत येऊ शकतो. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला आणि यादरम्यान आसाम संघाने आपला निर्णय बदलला. मात्र, मिळालेल्या जीवनदानचा रहाणेला फायदा घेता आला नाही. तो केवळ २२ धावा करून तंबूत परतला. रहाणे सध्या खराब फॉर्मचा सामना करत असून त्याने मागील ८ डावांमध्ये ११२ धावा केल्या आहेत.