भारताच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या अमोल मुझुमदारवर ( Amol Muzumdar ) मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ( MCA) क्रिकेट सुधारणा समितीनं मुझुमदार याची मुंबईच्या वरिष्ठ पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. जतिन परांजपे, निलेश कुलकर्णी व विनोद कांबळी यांच्या समितीनं ही निवड केली आहे. २०२१-२२च्या पर्वासाठी ही निवड असणार आहे. मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत भारताचा माजी फिरकीपटू साईराज बहुतुले व माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी हेही होते.
अमोलच्या नेतृत्वाखाली मुंबईनं रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाचा तो फलंदाजी प्रशिक्षक आहे. मागील पर्वात अमित पगणीस यांची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीच्या मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली होती, त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीसाठी भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. पण, आता रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर आहे.
अमोलनं १७१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३० शतकं व ६० अर्धशतकांसह ४८.१३च्या सरासरीनं ११,१६७ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ११३ सामन्यांत ३२८६ धावा आहेत.