मुंबई – IPL सामन्याआधी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून पोलिसांची थकबाकीचे पैसे द्यावेत अन्यथा पुढील क्रिकेट सामन्यांना सुरक्षा देऊ नका अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केली आहे. वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहे असं गलगलींनी सांगितले.
अनिल गलगली म्हणाले की, मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे १४.८२ कोटी रुपये थकविले असून पोलिसांच्या ३५ स्मरणपत्रांना केराची टोपली दाखविली आहे. थकबाकी आधी वसूल केल्यानंतर क्रिकेट सामन्यास सुरक्षा द्यावी. मुंबई पोलिस मुंबई क्रिकेट असोसिएशन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले १४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी ३५ स्मरणपत्रे पाठविली असं त्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी गेल्या ८ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष २०१३ मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष २०१६ चा विश्वचषक टी -20, वर्ष २०१६ मधील कसोटी सामने, २०१७ आणि २०१८ मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत असं त्यांनी सांगितले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या ८ वर्षात फक्त २०१८ च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३५ स्मरणपत्रे पाठवली आहेत. या थकबाकी रक्कमेवर ९.५ टक्के व्याज आकारले जाणार आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. मुंबई पोलिसांनी याबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना ९ वेळा पत्रव्यवहार केला आहे पण गृह खाते प्रतिसाद देत नाही. मी याबाबत पत्रव्यवहार करत असून मुंबई पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई न केल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई पोलिसांना गांभीर्याने घेत नाही असा आरोप RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
दरम्यान, अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य अधिकारी वर्गास पत्र पाठवलं आहे. त्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून १४.८२ कोटी थकबाकी वसूल न होइपर्यंत कुठल्याही क्रिकेट सामन्याला सुरक्षा न देणे आणि थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Web Title: Mumbai Cricket Association owes Rs 14.82 crore to Mumbai Police, RTI Revealed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.