MCA President Amol Kale :मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी रात्री एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसह न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधून भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि सर्वोच्च परिषदेचे सदस्य सूरज सामत यांच्यासह अमोल काळे यांनी रविवारी नासाऊ काउंटी स्टेडियममधून टी-२० वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना पाहिला होता. त्याचा फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर आता त्याच्या निधनाची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये वर्ल्डकप चॅम्पियन संदीप पाटील यांचा निवडणुकीत पराभव केल्यानंतर काळे यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. आगामी मोसमापासून मुंबईच्या वरिष्ठ खेळाडूंची मॅच फी दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी मोठा वाटा उचलला होता
कोण होते अमोल काळे?
मूळचे नागपूरचे असलेले अमोल काळे हे एक दशकाहून अधिक काळ मुंबईत स्थायिक होते आणि त्यांनी विविध व्यवसाय सुरू केले. याआधी ते नागपुरातील अभ्यंकर नगर येथे राहत होते. अमोल काळे यांचे आई वडील हे पेशाने शिक्षक होते आणि ते नागपुरातील नूतन भारत विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते. काळे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नेतृत्व करण्याबरोबरच अमोल काळे हे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे सह-प्रवर्तक देखील होते.
देवेंद्र फडणवीसांशी कसा संबंध?
नागपुरातील असल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अमोल काळे यांचे खास नाते होते. २०१४ मध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून काळेंकडे पाहिलं जात होतं. देवेंद्र फडणवीस आणि अमोल काळे हे बालपणीपासूनचे मित्र होते.देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे हे भाजपचे वार्ड अध्यक्ष होते.