मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) लवकरच आपल्या संविधानात बदल करण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा मतदानांचा हक्क काढून घेण्याचा समावेश आहे. अलीकडेच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) आपल्या संविधानात बदल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे, ज्याची सुनावणी अद्याप झाली नाही. बीसीसीआय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असतानाच मुंबई क्रिकेट असोसिएशन आपल्या संविधानात बदल करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये मुंबईचे माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar),सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar)यांसारख्या दिग्गजांच्या मतदानाचा हक्क काढून घेण्याचा प्रस्ताव आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनने २९ जुलै रोजी आपल्या जनरल बॉडीची बैठक बोलावली आहे. याच बैठकीमध्ये संविधान बदलण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या मतदानाचा हक्क काढून घेणे, ७० वर्षांहून अधिक वयाच्या अधिकाऱ्यांना पदावर कायम ठेवणे आणि असोसिएशनच्या सचिवांना अधिकार देणे अशा प्रस्तावाचा समावेश आहे.
दिग्गजांच्या मतदानाचा हक्क काढून घेणार?विशेष म्हणजे जर मुंबई क्रिकेट असोसिएशनने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केला तर मुंबईतील दिग्गज खेळाडूंच्या मतदानाचा हक्क काढून घेतला जाईल. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांसारख्या दिग्गजांच्या नावाचा समावेश आहे.
लोढा समितीविरोधात मुंबई असोसिएशनदेशातील प्रत्येक राज्याचे असोसिएशन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपल्या संविधानात बदल करण्याच्या तयारीत होते. कारण सर्वोच्च न्यायालयाकडून लोढा समिती स्थापन करण्यात आली होती, याच समितीने माजी क्रिकेटपटूंना मतदानाचा अधिकार दिला होता आणि ७० हून अधिक वयाच्या अधिकाऱ्यांना पदावर कायम राहण्यावर बंदी घातली होती.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना सहयोगी सदस्य म्हणून असोसिएशनशी जोडले जाईल पण त्यांना मतदानाचा अधिकार नसेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनप्रमाणे बीसीसीआयला देखील आपल्या संविधानात बदल करायचा आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात बोर्डाने दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणी झाली नाही.