Mumbai Cricketer Jemimah Rodrigues, Bribane Heat WBBL 10: टीम इंडिया सध्या कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. याचदरम्यान, तेथे महिला बिग बॅश सामनेही खेळले जात आहेत. या स्पर्धेत अनेक भारतीय महिला खेळाडूही खेळत आहेत. अशा भारतीय खेळाडूंपैकी एक आहे मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज. तिने आपल्या संघाच्या शानदार विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. तिच्या संघासाठी जेमिमा ही सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. WBBL मध्ये जेमिमा रॉड्रिग्ज ही ब्रिस्बेन हीट्स कडून खेळली आणि तिने मेलबर्न स्टार्सच्या गोलंदाजांची धुलाई केली.
मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलिया गाजवलं
सामन्यात मेलबर्न स्टार्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १३८ धावा केल्या. १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ब्रिस्बेन हीट्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांची सलामीची जोडी अवघ्या १२ धावांवर तुटली. मात्र त्यानंतर मुंबईकर फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने क्रीजवर येऊन धमाका केला. तिच्या खेळीने संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. जेमिमाने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. संघाला गरज असताना ती क्रीजवर ५० मिनिटं पाय रोवून उभी राहिली आणि तिने ३१ चेंडूंचा सामना करत ४५ धावा केल्या. तिने खेळीत ५ चौकार आणि २ षटकार लगावले. जेमिमाहने या डावात अर्धशतकी भागीदारी केली. संघाला विजयाच्या नजीक नेल्यावर जेमिमा बाद झाली पण तिच्या खेळीने सामन्याला कलाटणी दिली. जेमिमाच्या शानदार खेळीमुळे ब्रिस्बेन हीट्स संघाने मेलबर्न स्टार्सचा ६ गडी राखून पराभव केला.
जेमिमाच्या दमदार फलंदाजीआधी ब्रिस्बेन हीट्सकडून १८ वर्षीय गोलंदाज लुसी हॅमिल्टनने अप्रतिम गोलंदाजी केली. तिने ४ षटकांत केवळ ८ धावा देऊन ५ बळी घेतले.