महाराष्ट्रात बुधवारी 23,365 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 17,559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 7 लाख 92,832 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 9, 7125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.71% झाले आहे. पण, बुधवारी क्रिकेटवर्तुळाला चटका लावणारी बातमी समोर आली. मुंबईतील माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचे ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे निधन झाले. ते 52 वर्षांचे होते.
देशमुख यांनी मुंबई व महाराष्ट्राच्या रणजी संघात स्थान मिळवले होते, परंतु त्यांना अंतिम 11मध्ये संधी मिळाली नाही.''सचिन देशमुखने माझ्या नेतृत्वाखाली कूच बिहार चषक स्पर्धेत 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघाकडून पाच डावांत 183, 130 आणि 110 धावा चोपल्या होत्या. तो एक आक्रमक फलंदाज होता,''अशी माहिती अभिजित देशपांडे यांनी दिली. अभिजित हे सचिन देशमुखसह आंतरशालेय स्तरापासून खेळले आहेत आणि अभिजित हे महाराष्ट्राचे माजी रणजीपटू आहेत. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली.
देशमुख हे मुंबईत Excise आणि Customs मध्ये अधीक्षक होते. 90च्या दशकात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत पुणे विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करताना देशमुख यांनी सलग सात शतकं झळकावली होती. मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या देशमुख हे दादर पारसी झोरोस्टीयन क्रिकेट क्लब आणि महिंद्रा या स्थानिक क्लबकडून खेळले.