Mumbai Cricketer Siddharth Mohite creates World Record : मुंबई आणि क्रिकेट हे नातं काही वेगळंच आहे. मुंबईने क्रिकेट विश्वाला अनेक दिग्गज खेळाडू दिले. अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांसारख्या महान खेळाडूंनी क्रिकेटच्या माध्यमातून मुंबईचं नाव साऱ्या जगात पोहोचवलं. टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा हादेखील मुंबईकरच आहे. याच मुंबईतील एका १९ वर्षांच्या क्रिकेटपटूच्या दमदार कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद घेण्यात आली आहे. मुंबईच्या सिद्धार्थ मोहितेने सर्वाधिक काळ नेट्समध्ये फलंदाजी करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
मुंबईकर सिद्धार्थ मोहिते याने नेट्समध्ये तब्बल ७२ तास आणि पाच मिनिटं क्रीजवर फलंदाजी केली. त्यांच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. १९ वर्षीय सिद्धार्थ मोहितेने गेल्या आठवड्यात ७२ तास पाच मिनिटं फलंदाजी करून सहकारी विराग मानेचा २०१५ मधील ५० तासांचा विक्रम मोडीत काढला.
प्रशिक्षक ज्वाला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली केली कामगिरी
सिद्धार्थ मोहितेने याबाबत प्रसिद्धीपत्रकात लिहिलं आहे की, मी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. मी वेगळा आहे हे लोकांना दाखवण्याचा हा एक मार्ग होता. प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी मला माझ्या प्रयत्नात मदत केली. प्रत्येकजण मला मार्गदर्शनासाठी नकार देत होतं. मी ज्वाला सरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला होकार दिला. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आणि मला आवश्यक ते मार्गदर्शनही केलं.