धर्मशाळा : युवा फलंदाज सर्फराझ खान याने झळकावलेल्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर मुंबईने प्रतिकूल परिस्थितीतून सावरताना रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेशविरुद्ध पहिल्या दिअसअखेर ५ बाद ३७२ धावांची मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सर्फराझ नाबाद २२६, तर शुभम रांजणे नाबाद ४४ धावांवर खेळत होते.हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून मुंबईची ४ बाद ७१ अशी अवस्था केली. पुन्हा एकदा आघाडीचे फलंदाज ढेपाळल्याने मुंबईचा डाव गडगडला. मात्र सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या सर्फराझने मुंबईला मजबूत स्थितीत आणले. याआधी झालेल्या उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने संघाला महत्त्वपूर्ण ३ गुण मिळवून देताना तडाखेबंद नाबाद त्रिशतक ठोकले होते. त्याच खेळीचा कित्ता पुढे गिरवताना सर्फराझने शानदार द्विशतक झळकावले. त्याने आतापर्यंत २१३ चेंडूंत ३२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद २२६ धावा केल्या आहेत. शुभम ७५ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ४४ धावा काढून नाबाद आहे.त्याआधी मुंबईचा डाव चांगला अडचणीत आला होता. जय बिस्ट (१२), भूपेन लालवानी (१) आणि हार्दिक तामोरे (२) स्वस्तात परतल्याने मुंबईची ३ बाद १६ धावा अशी अवस्था झाली होती. यानंतर सिध्देश लाड (२०) आणि सर्फराझ यांनी ५५ धावा करत मुंबईला काहीप्रमाणात सावरले. लाड बाद झाल्यानंतर सर्फराझने कर्णधार आदित्य तरेसह (६२) १४३ धावांची भागीदारी करत मुंबईला चांगल्या स्थितीत आणले. तरेने १०० चेंडूंत ८ चौकारांसह आपली खेळी सजवली. यानंतर सर्फराझ-रांजणे यांनी नाबाद १५८ धावांची भागीदारी करत हिमाचलला बॅकफूटवर नेले. यावेळी खराब प्रकाशमानामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ७५व्या षटकातच थांबविण्यात आला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक : मुंबई (पहिला डाव) : ७५ षटकांत ५ बाद ३७२ धावा (सर्फराझ खान खेळत आहे २२६, आदित्य तरे ६२, शुभम रांजणे खेळत आहे ४४; वैभव अरोरा २/२८, रिषी धवन २/८१.)