मुंबई : रणजी चषकातील अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जवळपास दिवसभर फलंदाजी करत मुंबईकरांनी जबरदस्त वर्चस्व राखताना विदर्भाला तब्बल ५३८ धावांचे अशक्यप्राय असे लक्ष्य दिले. मुशीर खानने शानदार शतक झळकावत विदर्भाच्या गोलंदाजांची परीक्षा घेतली. तसेच कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या आंतरराष्ट्रीय फलंदाजांना शतकापासून मुकावे लागले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विदर्भाने दुसऱ्या डावात २ षटकांत बिनबाद १० धावा अशी सुरुवात केली. विदर्भ विजयापासून ५२८ धावांनी दूर आहे. मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात १३०.२ षटकांमध्ये सर्वबाद ४१८ धावा केल्या. मुशीरने ३२६ चेंडूंत १० चौकारांसह १३६ धावा केल्या. अय्यरने जबरदस्त फटकेबाजी केली. मात्र, शतकापासून केवळ ५ धावा दूर असताना बेजबाबदार फटका मारून तो झेलबाद झाला. अय्यरने १११ चेंडूंत १० चौकार व ३ षट्कारांसह ९५ धावा फटकावल्या. रहाणेने १४३ चेंडूंत ५ चौकार व एका षट्कारासह ७३ धावांची खेळी केली. हर्ष दुबेने १३५ धावांमध्ये ५ बळी घेत विदर्भाकडून चांगला मारा केला.
मुंबईने मंगळवारी २ बाद १४१ धावांवरून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर रहाणे लवकर बाद झाला. त्याने आपल्या धावसंख्येत केवळ १५ धावांची भर टाकली. परंतु, यानंतर मुशीर-अय्यर यांनी शतकी भागीदारी करत विदर्भाचे मानसिक खच्चीकरण केले. दोघांनी चौथ्या गड्यासाठी २५६ चेंडूंत १६८ धावांची भागीदारी करत सामना विदर्भाच्या आवाक्याबाहेर नेला. त्याआधी रहाणे-मुशीर यांनी तिसऱ्या गड्यासाठी २८७ चेंडूंत १३० धावांची भागीदारी केली होती. आदित्य ठाकरेने श्रेयसला बाद करून ही जोडी फोडल्यानंतर मुंबईने ठरावीक अंतराने बळी गमावले. मुंबईने ५९ धावांत ५ फलंदाज गमाविल्याने त्यांची ३ बाद ३३२ धावांवरून ८ बाद ३९१ धावा अशी घसरगुंडी उडाली. यादरम्यान एका बाजूने टिकून राहिलेल्या शम्स मुलानीने ८५ चेंडूंत नाबाद ५० धावांची खेळी केल्याने मुंबईला चारशे धावांचा टप्पा पार करता आला.
गावसकर, सचिन, रोहित यांची उपस्थिती
रणजी चषकातील अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लिटल मास्टर सुनील गावसकर, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांच्यासह भारताचा कर्णधार आणि मुंबईकर रोहित शर्मा यांची विशेष उपस्थिती राहिली. स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवर रोहित दिसल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी कल्ला केला.
मुशीरने मोडला सचिनचा विक्रम
रणजी चषक अंतिम सामन्यात शतक ठोकणारा मुशीर सर्वांत युवा मुंबईकर ठरला. हा पराक्रम करताना त्याने दिग्गज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने १९९४-९५ च्या मोसमात अंतिम लढतीत पंजाबविरुद्ध वायाच्या २१व्या वर्षी शतक ठोकले होते. मुशीरने वयाच्या १९व्या वर्षी शतक ठोकत सचिनला मागे टाकले. विशेष म्हणजे, मुशीरच्या फलंदाजीदरम्यान सचिन वानखेडे स्टेडियममध्ये
उपस्थित होता.
धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ६४.३ षटकांत सर्वबाद २२४ धावा.
विदर्भ (पहिला डाव) : ४५.३ षटकांत सर्वबाद १०५ धावा.
मुंबई (दुसरा डाव) : पृथ्वी शॉ त्रि. गो. यश ठाकूर ११, भूपेन लालवानी झे. काळे गो. दुबे १८, मुशीर खान पायचीत गो. दुबे १३६, अजिंक्य रहाणे झे. वाडकर गो. दुबे ७३, श्रेयस अय्यर झे. मोखाडे गो. ठाकरे ९५, हार्दिक तामोरे त्रि.गो. ठाकूर ५, शम्स मुलानी नाबाद ५०, शार्दूल ठाकूर त्रि.गो. दुबे ०, तनुष कोटियन त्रि.गो. दुबे १३, तुषार देशपांडे पायचीत गो. मोखाडे २, धवल कुलकर्णी झे. वाडकर गो. ठाकूर ०. अवांतर - १५. एकूण : १३०.२ षटकांत सर्वबाद ४१८ धावा. बाद क्रम : १-२६, २-३४, ३-१६४, ४-३३२, ५-३४३, ६-३५७, ७-३५७, ८-३९१.
गोलंदाजी : यश ठाकूर २२.२-४-७९-३; हर्ष दुबे ४८-४-१४४-५; उमेश यादव २५-२-६२-०; आदित्य ठाकरे १८-५-३९-१; आदित्य सरवटे ७-०-३५-०; करुण नायर ३-०-१९-०; अथर्व तायडे २-०-१०-०; अमन मोखाडे ५-०-१७-१.
विदर्भ (दुसरा डाव) : अथर्व तायडे खेळत आहे ३, ध्रुव शोरी खेळत आहे ७. अवांतर - ०. एकूण : २ षटकांत बिनबाद १० धावा.
गोलंदाजी : शम्स मुलाणी १-०-४-०; शार्दूल ठाकूर १-०-६-०.
Web Title: mumbai give target of 538 runs to vidarbha in ranji trophy final 2024
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.