मुंबईची दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक

अहमदाबाद : महत्त्वाच्या सामन्यात कमालीचा खेळ उंचावलेल्या बलाढ्य मुंबईने ओडिशाचा एक डाव आणि १०८ धावांनी फडशा पाडला. या दिमाखदार ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 05:28 AM2022-03-07T05:28:55+5:302022-03-07T05:29:02+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai hit the semi-finals in ranaji karandak cricket | मुंबईची दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक

मुंबईची दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : महत्त्वाच्या सामन्यात कमालीचा खेळ उंचावलेल्या बलाढ्य मुंबईने ओडिशाचा एक डाव आणि १०८ धावांनी फडशा पाडला. या दिमाखदार विजयासह मुंबईने रणजी चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थेट धडक मारली.

ओडिशाचा पहिला डाव २८४ धावांत गुंडाळल्यानंतर मुंबईने ९ बाद ५३२ धावांवर डाव घोषित करीत २४८ धावांची भक्कम आघाडी मिळविली. यानंतर ओडिशाला १४० धावांत बाद करीत मुंबईने सहज वर्चस्व राखले. मुंबईच्या डावात १८१ चेंडूंत १६५ धावांची खेळी करणारा सर्फराझ खान सामनावीर ठरला. अरमान जाफरने २२३ चेंडूंत १२५ धावा काढत त्याला चांगली साथ दिली. यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. यामध्ये अष्टपैलू शम्स मुलानी प्रभावी ठरला. त्याने ६४ धावांत ५ बळी घेत ओडिशाच्या फलंदाजीला सुरुंग लावला. तनुष कोटियनने ३, तर सिद्धार्थ राऊतने २ बळी घेत ओडिशाचा पराभव निश्चित केला. ओडिशाकडून दुसऱ्या डावात अभिषेक राऊतने (५९) एकाकी झुंज दिली.
 

विदर्भाचा विजय, पण...
रोहतक : विदर्भ संघाने ग गटात आसामचा ५ गड्यांनी पराभव केला. मात्र, यानंतरही त्यांना गटात दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने रणजी चषक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. या गटातून उत्तर प्रदेशने सर्वाधिक १३ गुणांसह आगेकूच केली असून, विदर्भाच्या खात्यात १२ गुणांची नोंद राहिली.
प्रथम फलंदाजी केलेल्या आसामने ३१६ धावा केल्यानंतर विदर्भाला २७१ धावांत गुंडाळत ४५ धावांची नाममात्र आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मात्र विदर्भाने फिनिक्स भरारी घेत आसामचा डाव ११० धावांत गुंडाळला. ललित यादव (५/२२) आणि रजनीश गुरबानी (४/३३) यांनी आसामची फलंदाजी उद्ध्वस्त केली. यानंतर विदर्भाने मिळालेले १५६ धावांचे आव्हान ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
लक्ष्याचा पाठलाग विदर्भाने सावध पवित्रा घेत विजय मिळविला. कर्णधार फैझ फझलने ४८ चेंडूंत ४१ धावा केल्या, तसेच अथर्व तायडे (२५), गणेश सतीश (२९), आदित्य सरवटे (२२*) आणि अपूर्व वानखेडे (१८*) यांनी संयमी खेळी करीत विदर्भाचा विजय साकारला. आसामकडून हृिदीप देकाने (४/४५) चांगली गोलंदाजी केली.

महाराष्ट्राचा अनपेक्षित पराभव
सुलतानपूर : पहिल्या डावात शतकी आघाडी घेतल्यानंतर महाराष्ट्राला रणजी चषक स्पर्धेच्या ग गटात उत्तर प्रदेशविरुद्ध ६ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. या जोरावर यूपीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ४६२ धावा केल्यानंतर यूपीला ३१७ धावांमध्ये बाद करीत १४५ धावांची दमदार आघाडी घेतली. दुसऱ्या डावात
महाराष्ट्राने ५ बाद २११ धावांवर डाव घोषित करीत यूपीला ३५६ धावांचे आव्हान दिले. राहुल त्रिपाठीने ११० चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांसह नाबाद १२३ धावा केल्या. महाराष्ट्र बाजी मारेल, असे दिसत असताना यूपीच्या अल्मस शौकत आणि कर्णधार कर्ण शर्मा यांनी महाराष्ट्राचा विजय हिसकावून नेला. दोघांच्या शतकी खेळाच्या जोरावर यूपीने ७०.१ षटकांत ४ बाद ३५९ धावा केल्या. अल्मसने १५४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह १०० धावा केल्या. कर्णने १४४ चेंडूंत ४ चौकार व ७ षटकारांचा पाऊस पाडताना ११६ धावांची निर्णायक खेळी केली. रिंकू सिंगने अखेरपर्यंत नाबाद राहताना ६० चेंडूंत ७८ धावा काढत यूपीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
 

Web Title: Mumbai hit the semi-finals in ranaji karandak cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.