इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलेल्या एका खेळाडूनं पुन्हा एकदा तुफानी खेळी केली. T10 लीगमध्ये सर्वाधिक धावा करून आयपीएल लिलावात सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या खेळाडूवर मुंबई इंडियन्सनं सर्वप्रथम बोली लावली आणि त्याला पटकन आपल्या संघात घेतले. त्याच्यासाठी अन्य सात संघांमध्ये चुरस रंगेल असे वाटत होते, परंतु लिलावात त्याचे नाव येताच मुंबई इंडियन्सने बोली लावली. त्यामुळे केवळ दोन कोटी मूळ किंमत असलेल्या या खेळाडूला मुंबई इंडियन्सने आपले केले. त्यानंतर चौकार - षटकारांची आतबाजी केली. शुक्रवारीही त्याच्या स्फोटक खेळीनं सर्वांचे लक्ष वेधले.
ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लीन असे या खेळाडूचे नाव आहे. लीनला डच्चू देण्याचा निर्णयाचा पश्चाताप कोलकाता नाइट रायडर्सला होत आहे. कारण, लीननं टी 10 लीगमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आणि त्यानं स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला. T10 लीगमध्ये मराठा अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लीननं 8 डावांत 236.30 च्या स्ट्राईक रेटनं 371 धावा केल्या. त्यानंतर बिग बॅश लिगमध्येही त्याची फटकेबाजी कायम राहिली.
सिडनी सिक्सर्स संघाविरुद्ध 94 धावा चोपणाऱ्या लीननं शुक्रवारी हॉबर्ट हरिकेन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर ब्रिस्बन हिट संघानं 3 बाद 212 धावा चोपल्या. बिग बॅश लीगमधील ही संघानं केलेली तिसरी सर्वोत्तम खेळी ठरली. प्रथम फलंदाजीला आलेल्या हिट संघाला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. त्यांचा सलामीवीर टॉम बँटम ( 8) लवकर माघारी परतला. त्यानंतर मॅक्स ब्रायंट आणि लीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 95 धावा जोडल्या. ब्रायंट 36 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकार खेचून 65 धावांत माघारी परतला.
लीननं तिसऱ्या विकेटसाठी मॅट रेनशॉसह झटपट अर्धशतकी भागीदारी केली. रेनशॉ 17 चेंडूंत ( 1 चौकार व 2 षटकार) 30 धावा करून माघारी परतला. पण, लीनची बॅट चांगलीच तळपली. त्यानं हरिकेन्स संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. लीननं बिग बॅश लीगमधील 18 वे अर्धशतक पूर्ण केले. तो 55 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकार खेचून 88 धावांवर नाबाद राहिला.