Mumbai Indians beat Gujarat WPL 2024: गतविजेत्या मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये सलग दुसरा सामना जिंकला. या सामन्यात मुंबईने गुजरात जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. अनुभवी वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल आणि लेगस्पिनर अमेलिया केर यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनेगुजरात जायंट्सला 9 विकेट्सच्या मोबदल्यात 126 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात हरमनप्रीत कौरच्या संघाने 19 व्या षटकात 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. यासोबतच मुंबई इंडियन्सने गुजरातसोबत आतापर्यंत झालेले तीनही सामने जिंकत विजयाची हॅटट्रिक केली.
गुजरातची फलंदाजी ढेपाळली
दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने गुजरातची फलंदाजी खिळखिळी केली. तिने 18 धावांत तीन बळी घेतले. केरने मधल्या फळीतील आणि खालच्या फळीतील फलंदाजांना टिकू दिले नाही आणि चार षटकांच्या कोट्यात १७ धावा देऊन चार बळी घेतले. गुजरातचे फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले, त्यापैकी नवव्या क्रमांकाची फलंदाज तनुजा कंवरने सर्वाधिक 28 धावांचे योगदान दिले. तिने कॅथरीन ब्राइस (नाबाद 25) सोबत आठव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. तनुजा आणि ब्राइसशिवाय कर्णधार बेथ मुनीने 24 आणि ऍशले गार्डनरने 15 धावांचे योगदान दिले.
हरमनप्रीत कौरने सामना संपवला
मुंबई इंडियन्सचीही सुरुवात खराब झाली. यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूजला मोठी खेळी खेळता आली नाही. दोघांच्या बॅटमधून 7-7 धावा निघाल्या. 21 धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर नाटे सिव्हर ब्रंट आणि हरमनप्रीत कौर यांनी डाव पुढे नेला. ब्रंट सहज धावा काढत होती पण २२ धावांवर धावबाद झाली. हरमनप्रीतने अमेलिया केरसह चौथ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. केर 25 चेंडूत 31 धावा केल्यानंतर LBW झाली.
त्यानंतर पूजा वस्त्राकर बाद झाल्यानंतर सामना संथ झाला. अमनजोत कौरला 5 चेंडूत खातेही उघडता आले नाही. मात्र हरमनप्रीत कौरने 18व्या षटकात चौकार आणि 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचून मुंबईला विजय मिळवून दिला. हरमनने 41 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या. गुजरातकडून तनुजा कंवरने दोन गडी बाद केले.