Mumbai Indians Cameron Green: IPL 2022 साठी मिनी लिलाव २३ डिसेंबरला पार पडला. या लिलावात स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने भरपूर खरेदी केली. पण आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. त्यांनी तब्बल १७.५० कोटी रुपयांची बोली लावून एका अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात स्थान दिले. मात्र कोट्यवधींचा मालक झालेला कॅमेरून ग्रीन लिलावाच्या ४ दिवसांनंतरच हा खेळाडू जखमी झाला आहे. या खेळाडूची दुखापत ही 'मुंबई इंडियन्स'साठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई इंडियन्सचा खेळाडू जखमी
IPL लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला १७.५० कोटींना विकत घेतले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळत असताना तो जखमी झाला. कॅमेरून ग्रीनची ही दुखापत इतकी गंभीर होती की त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, ग्रीनच्या दुखापतीचे स्कॅनिंग केले जाईल आणि त्यानंतरच त्याच्या पुढे खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
वेगवान चेंडूमुळे झाला जायबंदी
ऑस्ट्रेलियाच्या डावात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्किया ८५वे षटक टाकत होता. एनरिक नॉर्खियाचा वेगवान चेंडू थेट कॅमेरून ग्रीनच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला. यानंतर त्याच्या बोटातूनही रक्त येत असल्याचे दिसून आले. या दुखापतीमुळे त्याला पहिल्या सामन्यात पुढे फलंदाजीही करता आली नाही. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, या सामन्याच्या पहिल्या डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रमही कॅमेरून ग्रीनने केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एमसीजी येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने ही अप्रतिम कामगिरी केली. ग्रीनने आफ्रिकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांना बाद करून २७ धावांत ५ बाद अशी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट आकडेवारी घेतली आणि पाहुण्यांना पहिल्या डावात १८९ धावांत गुंडाळले. डिसेंबर २०२० मध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कॅमेरून ग्रीनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये २३ बळी घेतले आहेत.