इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावर Corona Virus चे सावट आहे. त्यामुळे ही स्पर्धा होईल की नाही यावर साशंकता आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरस अधिक परसण्याची भीती जास्त आहे. तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पर्धा नियोजित वेळेतच होईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व संघ तयारीला लागले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात २९ मार्चला सलामीचा सामना होणार आहे. पण, मंगळवारी मुंबई इंडियन्सची चिंता येणारी बातमी धडकली आहे. त्यांच्या अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला दुखापत झाली आहे आणि त्यानं ट्वेंटी-२० लीगमधून माघार घेतली आहे.
टेंशन घेऊ नका... पोलार्डने आयपीएल मधून माघार घेतलेली नाही. त्यानं पाकिस्तान सुपर लीगमधून ( पीएसएल) माघार घेतली आहे. त्याच्या उजव्या मांडीला दुखापत झाली, त्यामुळे त्यानं हा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या १३ व्या मोसमाला सुरुवात होईपर्यंत तो तंदुरुस्त होईल. पीएसएलमध्ये पोलार्ड हा पेशावर झाल्मी संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि आता त्याच्या जागी कार्लोस ब्रॅथवेट खेळणार. वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेनंतर पोलार्ड पीएसएलमध्ये दाखल होणार होता, परंतु दुखापतीमुळे त्यानं यंदा पीएसएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेथवेटला ६ मार्चपर्यंत पोलार्डचा पर्यायी खेळाडू म्हणून पीएसएसमध्ये सामील करून घेतले होते, परंतु आता पोलार्डच्या अनुपस्थितीमुळे ब्रेथवेटचा करार वाढवण्यात आला आहे. ''यंदा मी पीएसएलमध्ये खेळू शकणार नाही, यासाठी सर्वांची माफी मागतो. पण, संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत आणि डॅरेन सॅमीच्या प्रशिक्षक म्हणून पहिल्याच हंगामात संघ जेतेपद पटकावेल, असा विश्वास आहे, '' असे पोलार्डने त्याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
पेशावर झाल्मी संघ सध्या गटात दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत ८ सामन्यांत ४ विजय मिळवले आहेत, तर ३ सामने गमावले आहेत. एक सामना रद्द करावा लागला.