मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी हार्दिक पांड्याचे नाव कर्णधार म्हणून जाहीर केले. गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये परतलेल्या हार्दिककडे नेतृत्व सोपवत असल्याची घोषणा आज फ्रँचायझीने केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलची पाच जेतेपदं पटकावली आहेत. पण, यापुढे हार्दिकच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे.
मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ फरफॉर्मन्स प्रमुख माहेला जयवर्धने म्हणाला,''मुंबई इंडियन्ससाठी भविष्याच्या तयारीच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. सचिन तेंडुलकर ते हरभजन सिंग आणि रिकी पाँटिंग ते रेहित शर्मा यासारख्या दिग्गजांचे मुंबई इंडियन्सला नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. आता भविष्याचा विचार करताना निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो; २०१३ पासूनचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ अविश्वसनीय होता. त्याच्या नेतृत्वाने संघाला अतुलनीय यशच मिळवून दिले नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून त्याचे स्थान पक्के केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ बनला. त्याचा अनुभव व मार्गदर्शन यापुढेही संघाला मजबूत करण्यासाठी मिळत राहणार आहे, असेही जयवर्धने म्हणाला.
रोहित शर्माचं काय?२०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीपासून रोहित शर्मा ट्वेंटी-२० क्रिकेट खेळलेला नाही. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही तो भारतीय संघाकडून खेळेल याची शक्यता कमी आहे. अशात मुंबई इंडियन्सनेही भविष्याचा विचार करून हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. रोहित ३६ वर्षांचा आहे आणि त्याच्या देखरेखीखाली हार्दिककडून संघ तयार व्हावा अशी फ्रँचायझीची इच्छा आहे.