मुंबई : धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने गुरुवारी डी. वाय. पाटील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत वादळी खेळी केली. युवी 2019च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई संघाने अगदी शेवटच्या क्षणाला युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यामुळे आयपीएलमध्ये युवराजची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. युवराजनेही आयपीएलमध्ये धडाकेबाज पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. मुंबई इंडियन्सनेही युवीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि एक व्हिडीओ शेअर केला.
मुंबईत सुरू असलेल्या डी. वाय. पाटील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत युवीने एअर इंडिया संघाचे प्रतिनिधित्व करताना 57 चेंडूंत 80 धावा चोपल्या. मात्र, मुंबई कस्टम्स संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. एअर इंडियाचे दोन फलंदाज अवघ्या 12 धावांवर माघारी परतले त्यानंतर युवराजने तिसऱ्या विकेटसाठी पॉल वॅल्थॅटीसह 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने सुजीत नायकसह 88 धावांची भागीदारी करताना संघाला 7 बाद 169 धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई कस्टम्सच्या विक्रमांत औटी ( 52 चेंडूंत नाबाद 86) आणि स्वप्निल प्रधान ( 53 चेंडूंत 67 धावा) करत एअर इंडियाला पराभूत केले.
मुंबई इंडियन्सने युवीचे कौतुक केले आणि त्याच्या फटकेबाजीचा व्हिडीओ शेअर केला...