भारतात क्रिकेट म्हणजे जणू काही धर्मच... या धर्माचे कोट्यवधी भक्त आहेत. भारतीय जनतेनं क्रिकेटला भरभरून प्रेम दिलं. अलीकडेच पार पडलेल्या विश्वचषकाला चाहत्यांच्या प्रेमामुळे रंग चढला. वन डे क्रिकेटची क्रेझ कमी होत असताना भारतात झालेल्या विश्नचषकानंतर ५० षटकांच्या क्रिकेटला नवीन बळ मिळाले. आता जग ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रमले असून जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. इथे जगभरातील नामांकित खेळाडू निर्भयपणे खेळून षटकार, चौकारांचा वर्षाव करतात. गोलंदाज देखील कमी नसून एका षटकात सामना फिरवण्याची किमया साधतात. आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, किंबहुना घडतही आहेत. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने कर्णधारपदी हार्दिक पांड्याची वर्णी लावली अन् रोहित शर्माला या पदावरून पायउतार व्हावे लागले.
रोहितच्याच नेतृत्वात मुंबईने पाचवेळा किताब पटकावण्याची किमया साधली. पण, हार्दिक पांड्याला कर्णधारपद सोपवण्याचा धाडसी निर्णय मुंबईने का घेतला असावा असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. जाणकारांच्या मते संघरचनेत बदल केल्याने मुंबईच्या संघाला नवी उभारी मिळेल. तर दुसरीकडे चाहते संताप व्यक्त करत आहेत. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.
हार्दिकची एन्ट्री अन् कर्णधारपद हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने १२३ आयपीएल सामन्यांत २३०९ धावा केल्या आहेत आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी मुंबई इंडियन्सकडे १५.२५ कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला १५ कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला हार्दिकला संघात घेण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी १७.५ कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला RCB सोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. खरं तर मुंबईच्या संघात येण्यापूर्वी हार्दिकने एक मोठी अट ठेवली होती ती म्हणजे कर्णधारपद.
'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रथम मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने ट्रेडसाठी हार्दिकशी संपर्क साधला. पण हार्दिकने यासाठी कर्णधारपदाची अट ठेवली होती. पांड्याची अट मान्य करत मुंबईने आपला मावळता कर्णधार रोहित शर्मासोबत चर्चा केली. हार्दिकची अट रोहितच्या कानावर घातल्यानंतर मुंबईच्या फ्रँचायझीने पुढील निर्णय घेतला. तसेच रोहितने हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळण्यास होकार दिल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली.
रोहितच्या नेतृत्वात मुंबईचा विजयरथ पण... आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे रोहित शर्मा. हिटमॅनच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये किताब पटकावण्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला यश आले. मुंबईशिवाय चेन्नई सुपर किंग्जने देखील पाचवेळा जेतेपद पटकावण्याची किमया साधली.
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला.